मुख्यमंत्र्यांसोबत बैठक न झाल्यास मंत्रालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा इशारा; मुंबईत अमर कसबे यांची गर्जना!

दिनांक.24 जून 2026. बुधवार. मुंबई – निर्भीड जनता न्यूज नेटवर्क.

मांग गारुडी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आरपारची लढाई; शासनाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

मांग गारुडी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत समाजाच्या वतीने मुंबई येथील पत्रकार भवनात राष्ट्रीय अध्यक्ष अमर कसबे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शासनाने समाजाच्या मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित न केल्यास मंत्रालयासमोर सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

पत्रकार परिषदेत बोलताना अमर कसबे यांनी सांगितले की, मांग गारुडी समाज अनेक वर्षांपासून आपल्या मूलभूत हक्कांसाठी संघर्ष करीत आहे. विविध सरकारे बदलली, आश्वासने मिळाली; मात्र प्रत्यक्षात समाजाच्या विकासासाठी कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून आता निर्णायक लढा उभारण्याची वेळ आली आहे.

यावेळी समाजाच्या विकासासाठी ५०० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करावा, प्रत्येक विभागीय स्तरावर स्वतंत्र समाज भवन उभारावे, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यास आयोग स्थापन करावा, विधान परिषदेत समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, तसेच मागासवर्गीय योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

तसेच राज्यातील बेघर आणि भूमिहीन मांग गारुडी कुटुंबांना घरकुले व जमिनीचे हक्क मिळावेत, शासकीय कार्यालयांमध्ये समाजातील सुशिक्षित युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र धोरण आखावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

अमर कसबे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शासनाने समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. मुख्यमंत्री यांच्यासोबत तातडीने बैठक घेऊन मागण्यांवर निर्णय घ्यावा, अन्यथा मंत्रालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

पत्रकार परिषदेस समाजातील विविध राज्यांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त केला. समाजाच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने पाहून तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी सर्वांनी केली.

मांग गारुडी समाजाच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, शासन यावर काय भूमिका घेते याकडे आता समाजाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!