दिनांक. 26 मे 2026 मंगळवार. विशेष वृत्त निर्भीड जनता न्यूज
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने डॉ.गौरव घोडे व शिवभक्तांचा ऐतिहासिक उपक्रम; होदिगेरे येथील समाधी संवर्धनाची देशभरात चर्चा!
छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील तथा स्वराज्याच्या पायाभरणीमागील प्रेरणास्थान असलेले श्रीमंत छत्रपती शहाजीराजे महाराज यांच्या कर्नाटकातील होदिगेरे येथील समाधीस्थळाच्या संवर्धनासाठी अखेर एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असलेल्या या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी स्थळावर आता संरक्षणात्मक मेघडंबरी उभारण्यात आल्याने शिवप्रेमी, इतिहास अभ्यासक आणि महाराष्ट्रासह देशभरातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
शहाजीराजे भोसले यांचे निधन २३ जानेवारी १६६४ रोजी झाले होते. त्यांच्या समाधीला आज तब्बल ३६२ वर्षे पूर्ण झाली असून, इतक्या प्रदीर्घ काळानंतरही या ऐतिहासिक स्थळाच्या संवर्धनाकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले गेले नव्हते, अशी खंत अनेक शिवभक्तांकडून व्यक्त केली जात होती. मात्र आता समाधीस्थळाच्या संरक्षणासाठी उचलण्यात आलेले हे पाऊल ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.
शहाजीराजे महाराज हे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील नव्हते, तर स्वराज्याची संकल्पना रुजवणारे दूरदृष्टीचे नेतृत्व, पराक्रमी योद्धे आणि राजकीय कौशल्य असलेले महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कार्याचा आणि त्यागाचा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी होदिगेरे येथील समाधीस्थळाचे जतन व संवर्धन होणे अत्यंत आवश्यक असल्याची भावना शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे.
शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना, ऐतिहासिक वारसा व मंदिर संवर्धन महाराष्ट्र राज्य प्रमुख तसेच श्री स्वामी ॐ मल्हारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गौरव घोडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी स्वखर्चातून सुमारे साडेचार लाख रुपयांच्या खर्चातून साडेचारशे किलो वजनाची सुबक मेघडंबरी उभारण्यात आल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली.
या उपक्रमात प्रसाद चव्हाण, आकाश चव्हाण, काशिनाथ ओझरकर, महावीर पाटोळे, सुनील ढवळे आणि अविनाश कदम या शिवभक्तांनी सहभाग घेतल्याचे सांगण्यात आले. संबंधितांनी “वेडात मराठे वीर दौडले सात” या नावाने ऐतिहासिक प्रेरणेतून हे कार्य पूर्णत्वास नेल्याचे नमूद केले आहे.

इतिहास अभ्यासकांच्या मते, शहाजीराजे महाराज यांचे योगदान मराठा साम्राज्याच्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेमागे शहाजीराजांनी दिलेली राजकीय, लष्करी आणि सांस्कृतिक परंपरा प्रभावी ठरली होती. त्यामुळे त्यांच्या समाधीस्थळाच्या संवर्धनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून विविध शिवप्रेमी संघटनांकडून उपस्थित केला जात होता.
होदिगेरे येथील समाधीस्थळ अनेक वर्षे नैसर्गिक परिस्थितीचा सामना करत असल्याची चर्चा विविध माध्यमांतून होत होती. पाऊस, वारा आणि उन्हामुळे समाधी परिसराच्या संरक्षणाची गरज व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर संरक्षणात्मक संरचना उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

याबाबत बोलताना डॉ. गौरव घोडे म्हणाले की,“छत्रपती शहाजीराजे हे स्वराज्याच्या इतिहासातील अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्यामुळेच महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान राजा लाभला. इतक्या महान व्यक्तीच्या समाधीची अवस्था पाहून मन हेलावून गेले होते. हे कार्य कोणत्याही प्रसिद्धीसाठी नसून इतिहास आणि स्वराज्याविषयी असलेल्या निष्ठेतून करण्यात आले आहे. भविष्यातही हिंदू धर्म, ऐतिहासिक वारसा, मंदिरे आणि समाधीस्थळांच्या संवर्धनासाठी आमचे कार्य सुरू राहील.”या उपक्रमासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे आणि रामसाहेब रेपाळे यांचे सहकार्य लाभल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
इतिहास अभ्यासक आणि शिवप्रेमींकडून या उपक्रमाचे स्वागत केले जात असून, अनेकांनी हे कार्य “शिवभक्तांच्या भावनेचा विजय” असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर देखील या कार्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून, महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
दरम्यान, “श्री स्वामी ॐ मल्हारी प्रतिष्ठान”तर्फे यापूर्वीही अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा संवर्धनाची कामे करण्यात आली आहेत. छत्रपती ताराराणी भोसले यांच्या समाधीचे संवर्धन, थोरले शाहू महाराजांच्या जन्मखुणांचे संरक्षण, भवानीबाई राजे महाडिक यांच्या समाधी परिसरातील कामे तसेच मालोजीराजे भोसले यांच्या समाधीच्या जतनासाठी प्रयत्न अशा अनेक उपक्रमांचा त्यात समावेश आहे.
इतिहास जपण्याच्या आणि स्वराज्याच्या स्मृती संवर्धित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात असून, भविष्यात शहाजीराजांच्या समाधीस्थळाचा अधिक व्यापक जीर्णोद्धार व्हावा, अशी अपेक्षा शिवभक्तांकडून व्यक्त केली जात आहे.
या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कार्याबद्दल विविध स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत असून, सामाजिक व ऐतिहासिक क्षेत्रातील मान्यवरांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
याच पार्श्वभूमीवर विश्वशांती दूत तसेच पत्रकार सेवा संघाचे मार्गदर्शक डॉ. सुधीर तारे यांनी तसेच पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रामनाथ जऱ्हाड यांनी डॉ. गौरव घोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कार्याचे विशेष कौतुक करत, “इतिहास आणि स्वराज्याचा वारसा जपण्यासाठी अशा प्रकारचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. भविष्यातही हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आपली वाटचाल अधिक भक्कमपणे सुरू राहो,” अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या.
इतिहास, संस्कृती आणि स्वराज्याच्या स्मृती जपण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात असून, महाराष्ट्रासह देशभरातील शिवभक्तांकडून या कार्याबद्दल समाधान आणि अभिमान व्यक्त केला जात आहे.
