दिनांक. 05 जून 2026. शुक्रवार. अहिल्यानगर – निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी मोठे पाऊल; ‘पुस्तकांचे गाव’ योजनेचे नियोजन समन्वयाने करण्याचे आवाहन
ग्रामीण भागात वाचन संस्कृतीचा प्रसार, ज्ञानाचा व्यापक विस्तार आणि साहित्यिक वातावरण निर्मितीच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘पुस्तकांचे गाव’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून सुसूत्र नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘पुस्तकांचे गाव-विस्तार’ योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, तहसीलदार नागेश गायकवाड, जिल्हा ग्रंथालय निरीक्षक रामदास शिंदे, मराठी भाषा समिती सदस्य किशोर मरकड, संजय कळमकर, शशिकांत नजन तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सांगितले की, वाचन संस्कृती ही समाजाच्या बौद्धिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विकासाचा भक्कम पाया आहे. आजच्या डिजिटल युगात पुस्तकांचे महत्त्व अधिक अधोरेखित होत असून ग्रामीण भागातील विद्यार्थी, युवक, महिला आणि नागरिकांना दर्जेदार साहित्य सहज उपलब्ध व्हावे, यासाठी ‘पुस्तकांचे गाव’ ही संकल्पना अत्यंत परिणामकारक ठरणार आहे.
ते पुढे म्हणाले की, हा उपक्रम केवळ पुस्तकांच्या विक्रीपुरता किंवा प्रदर्शनापुरता मर्यादित न ठेवता तो एक सर्वसमावेशक ज्ञानकेंद्र म्हणून विकसित करण्यात यावा. यामध्ये ग्रंथदालन, अभ्यासिका, वाचनालय, साहित्यिक संवाद, लेखक-रसिक भेटी, बालवाचन उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध ज्ञानवर्धक उपक्रमांचा समावेश करून वाचनाची चळवळ उभी करणे आवश्यक आहे.

जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी ‘पुस्तकांचे गाव’ उभारताना स्थानिक वैशिष्ट्ये, उपलब्ध जागा, त्या भागातील वाचन संस्कृतीची परंपरा तसेच पर्यटन विकासाची क्षमता यांचाही विचार करण्याच्या सूचना दिल्या. पुस्तकांच्या माध्यमातून गावाला नवी ओळख निर्माण करून देण्याबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बैठकीत जिल्ह्यातील संभाव्य ठिकाणांची निवड, आवश्यक पायाभूत सुविधा, ग्रंथसंपदेची उपलब्धता, वाचनालय विकास, पर्यटनाशी जोडता येणाऱ्या संधी आणि विविध विभागांच्या सहभागाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच या उपक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यक असलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला.
‘पुस्तकांचे गाव’ ही संकल्पना ग्रामीण भागात ज्ञान, साहित्य आणि संस्कृतीचा संगम घडवून आणणारी ठरणार असून वाचन संस्कृतीला नवे बळ देणारा हा उपक्रम जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली.
