दिनांक. 07 जुलै 2026. मंगळवार. आश्वी – निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
तक्रारदाराच्या तक्रारीनंतर घटनास्थळी भेट; पोल्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात माशांचा प्रादुर्भाव आढळला नाही.
आश्वी-उंबरी शिवरस्त्यालगत असलेल्या कुक्कुटपालन शेडमुळे परिसरात माशांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत असल्याच्या राजेंद्र जऱ्हाड यांच्या तक्रारी वर बातमी प्रसिध्द केल्यानंतर “निर्भीड जनता न्यूज”ने या प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान घटनास्थळी दिसून आलेली परिस्थिती आणि राजेंद्र जऱ्हाड यांच्या कडून प्राप्त झालेल्या तक्रार यामध्ये काही बाबी वेगळ्या असल्याचे प्राथमिक निरीक्षणात आढळून आले.

प्रत्यक्ष पाहणीदरम्यान संबंधित कुक्कुटपालन शेड परिसरात कुठल्याच प्रकारे मोठ्या प्रमाणात माशांचा प्रादुर्भाव कुठेही आढळून आला नाही. परिसरात अत्यल्प प्रमाणात काही माशा दिसून आल्या, त्यापैकी काही मृत अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. तसेच शेडमध्ये स्वच्छता राखण्यासाठी काही आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचेही प्राथमिक पाहणीत दिसून आले.

मात्र, याचा अर्थ परिसरातील नागरिक राजेंद्र जऱ्हाड यांनी केलेली तक्रार चुकीची आहे किंवा संबंधित कुक्कुटपालन शेडमुळे कोणताही त्रास होत नाही, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. त्याचप्रमाणे माशांचा उपद्रव केवळ संबंधित कुक्कुटपालन शेडमुळेच होत आहे, असेही या पाहणीच्या आधारे निश्चितपणे म्हणता येणार नाही.
स्थानिक तक्रारदाराने व्यक्त केलेली तक्रार आणि प्रत्यक्ष पाहणीत दिसून आलेली परिस्थिती या दोन्ही बाबी लक्षात घेता, या प्रकरणाची सखोल आणि तांत्रिक तपासणी संबंधित प्रशासनाने करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग तसेच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी संयुक्त पाहणी करून माशांच्या प्रादुर्भावाचे नेमके कारण शोधावे आणि वस्तुस्थिती जनतेसमोर स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
‘निर्भीड जनता न्यूज’ ची भूमिका सुरुवातीपासूनच स्पष्ट असून, कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरोधात किंवा कुक्कुटपालन व्यवसायिकांविरुद्ध एकतर्फी भूमिका घेण्याऐवजी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे हेच आमचे कर्तव्य आहे. नागरिकांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर ती प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून घटनास्थळी दिसून आलेले प्राथमिक निरीक्षणही आम्ही तेवढ्याच जबाबदारीने जनतेसमोर ठेवत आहोत.
या प्रकरणात अंतिम निष्कर्ष काढण्याचा अधिकार संबंधित शासकीय यंत्रणांचा असून, प्रशासनाच्या अधिकृत तपासणीनंतरच माशांच्या प्रादुर्भावामागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल. तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे ठोस निष्कर्ष काढणे उचित ठरणार नाही.

‘निर्भीड जनता न्यूज’ पुढेही या प्रकरणावर लक्ष ठेवून प्रशासनाची भूमिका, नागरिकांचे म्हणणे आणि संबंधित कुक्कुटपालन शेड व्यवस्थापनाची बाजू निष्पक्षपणे जनतेसमोर मांडत राहील.
या प्रकरणात जर प्रशासनाकडून अधिकृत तपासणी झाली किंवा त्याचा अहवाल समोर आला, तर तोही जनतेपर्यंत तितक्याच जबाबदारीने पोहोचविण्यात येईल. सत्य समोर यावे, कोणावरही अन्याय होऊ नये, हाच ‘निर्भीड जनता न्यूज’चा प्रयत्न आहे.
संबंधित कुक्कुटपालन शेड व्यवस्थापनाने ‘निर्भीड जनता न्यूज’शी बोलताना सांगितले की, शेडमध्ये नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि माशांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक औषध फवारणी केली जाते. प्रत्यक्ष पाहणीदरम्यानही शेड परिसरात मोठ्या प्रमाणावर कुठल्याही प्रकारे माशांचा उपद्रव आढळून आला नसल्याचे दिसून आले.
यावेळी कुक्कुटपालन व्यवसायिक योगेश पिलगर यांनी निर्भीड जनता न्यूज शी बोलताना सांगितले की “आमचा व्यवसाय हा शासनाच्या नियमांनुसार चालवला जात असून परिसरातील स्वच्छतेबाबत आम्ही सातत्याने आवश्यक काळजी घेतो. परिसरात माशांचा त्रास असल्यास त्यामागे नेमके कारण काय आहे, याची प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करावी. जर आमच्याकडून कोणतीही त्रुटी आढळली, तर त्या दूर करण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू. मात्र कोणत्याही अधिकृत निष्कर्षाशिवाय केवळ आमच्या व्यवसायाला दोष देणे योग्य ठरणार नाही. “पिलगर यांनी पुढे सांगितले की, कुक्कुटपालन हा अनेक कुटुंबांच्या रोजगाराचा आधार असून नागरिकांच्या आरोग्याची काळजी आणि व्यवसायाची जबाबदारी या दोन्ही बाबी आम्ही तितक्याच गांभीर्याने घेत आहोत. प्रशासनाने संयुक्त पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी आमचीही भूमिका आहे. यावेळी कुक्कुटपालन व्यावसायिक उपस्थित होते.
