पाथरी (प्रतिनिधी) :
पाथरी शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा (मराठी माध्यम) शाखेचा परिसर सध्या शाळेपेक्षा एखाद्या तलावासारखा दिसत आहे. 17 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शाळेच्या संपूर्ण मैदानात पाणी साचले असून, विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना चिखल, घसरामाऱ्या आणि आजारांच्या धोक्याला सामोरे जावे लागत आहे. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांचा गणवेश खराब होत आहे. पाय घसरून अपघात होत आहेत.

त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास घाबरत आहेत. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे. शिवाय त्यांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. शाळा परिसरात साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी, कचरा आणि डासांचा उपद्रव वाढला आहे. परिणामी मलेरिया, डेंग्यू यांसारख्या संसर्गजन्य रोगांचा धोका गडद झाला आहे. इतकेच नव्हे, तर परिसरात साप व विचू यांसारखे प्राणीही दिसून येत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सदर मैदान हे अनेकदा राजकीय सभा व शासकीय कार्यक्रमासाठी वापरले जाते. मात्र याच मैदानात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची दैन्यावस्था अस्वस्थ करणारी आहे. शेजारीच गटशिक्षणाधिकारी कार्यालय आणि पीएम श्री दर्जाची उर्दू शाळा असतानाही मराठी शाळेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तिव्र टीका पालक व नागरिकांकडून होत आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा अन्सारी यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा पालक आणि विद्यार्थी यांच्यासह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.शाळा म्हणजे भविष्यासाठी शिक्षणाचा पाया, मात्र या शाळेची विदारक अवस्था पाहता प्रशासनाच्या उदासीनतेचे गंभीर प्रतिबिंब उमटते आहे.
