संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापुर शिवारातील मनोली रस्त्यावर, अरगडे आणि भुसाळ वस्तीच्या दरम्यान सोमवार, दिनांक 21 जुलै 2025 रोजी सकाळी ठीक 11 वाजता घडलेल्या भीषण अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. समोरून आलेल्या वाहनाने अचानक दिलेल्या हुलकावणीमुळे हा अपघात घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
अपघातात मृत्यू झालेले भास्कर बाबन मांढरे (वय ७५) आणि जखमी विकास साहेबराव गायकवाड हे दोघेही आश्वी खुर्द (ता. संगमनेर) येथील रहिवासी आहेत. हे दोघे स्विफ्ट चारचाकी वाहनाने संगमनेरच्या दिशेने जात असताना उंबरी बाळापुर शिवारात समोरून आलेल्या वाहनाने अचानक हुलकावणी दिली. त्यामुळे हा अपघात झाला आहे.
अपघाताचा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. दोघांना तातडीने संगमनेर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच भास्कर मांढरे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. विकास गायकवाड यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
भास्कर मांढरे हे डॉक्टर दत्तात्रय मांढरे यांचे चुलते होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे. मांढरे हे शांत स्वभावाचे, मनमिळावू आणि समाजप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने गावात व परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, सायंकाळी शिबलापूर येथील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
