संगमनेर निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
पवित्र पोर्टल भरती प्रक्रियेत शारीरिक शिक्षकांच्या पदांची तातडीने भरती करावी, अशी ठाम मागणी महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षक महासंघाने केली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक शिक्षण महत्त्वाचे असताना या विषयाकडे शासनाने कायम दुर्लक्ष केले असल्याचा आरोप महासंघाने केला.
शालेय जीवनात लठ्ठपणा, हालचालीचा अभाव, मोबाईलचे व्यसन, शिस्तीचा अभाव अशा समस्या वाढत आहेत. अशा परिस्थितीत शारीरिक शिक्षकच विद्यार्थ्यांना निरोगी आयुष्याचा मार्ग दाखवू शकतात. मात्र, गेल्या 15-20 वर्षांपासून जिल्हा परिषद, मनपा, नपा, समाजकल्याण व आदिवासी विभागातील शाळा तसेच महाविद्यालयांत या पदांची भरती झालेली नाही. परिणामी बी.पी.एड. आणि एम.पी.एड. धारक हजारो युवक बेरोजगार असून, प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, शासन निर्णय 15 मार्च 2024 व 21 ऑगस्ट 2025 नुसार प्रत्येकी 251 विद्यार्थ्यामागे एक शारीरिक शिक्षक नेमणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात ते अमलात आणले गेलेले नाही. यासाठी महासंघाने राज्यभर निवेदन मोहिम राबवून लोकप्रतिनिधी, मंत्री व मुख्यमंत्री यांना मागण्या सादर केल्या.
या निवेदनात शाळा व महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलमार्फत तातडीने करावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली. विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांना देण्यात आलेल्या निवेदनावेळी महासंघाचे हजारे शंकर सर, कदम चंद्रकांत सर उपस्थित होते.
या मोहिमेत गणेश लहाने, सुनील चव्हाण, शुभम ताकीक, लिंबाजी भले यांच्यासह राज्य कोर कमिटीने शारीरिक शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने सकारात्मक पाऊल उचलावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
