अतिवृष्टीने हवालदिल शेतकरी; तातडीच्या मदतीसाठी तहसीलदारांकडे सामाजिक कार्यकर्ते मोहित गायकवाड यांचे निवेदन!

संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

तालुक्यातील पूर्व भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः हाल झाले आहेत. दि. २६ व २७ सप्टेंबर रोजी ९० ते १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने आश्वी पंचक्रोशीसह अनेक गावांमध्ये पिके पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर पाणी साचून पिके सडली, जनावरांचा चारा नष्ट झाला, काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्या तर काही शेतकऱ्यांच्या गायी-जनावरे मृत्युमुखी पडली. परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

या बिकट परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री. मोहित गंगाधर गायकवाड (रा. आश्वी खुर्द, ता. संगमनेर) यांनी तहसीलदार संगमनेर यांना निवेदन सादर केले. यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे कोणतेही निकष न लावता सरसकट पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

शेतीसोबत दुग्धव्यवसायालाही मोठा फटका

संगमनेर तालुक्यातील शेतकरी शेतीसोबत दुग्धव्यवसायावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. परंतु, अतिवृष्टीमुळे गायी-जनावरे मृत्युमुखी पडली असून, उरलेल्या जनावरांना खुराक मिळणे कठीण झाले आहे. पिके आणि चारा दोन्हीही सडून गेल्याने शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ लागली आहे. दिवाळीसारखा मोठा सण तोंडावर असताना शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे.

कर्जवसुलीला स्थगितीची मागणी

शेतकऱ्यांची आणखी एक मोठी चिंता म्हणजे कर्ज. राष्ट्रीयकृत बँका, शेड्यूल्ड बँका व पतसंस्थांकडून शेतकऱ्यांना वसुलीचा तगादा लावला जात आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शासनाने विशेष परिपत्रक जारी करून शेतकऱ्यांना कर्ज भरण्यास मुदतवाढ द्यावी, तसेच आर्थिक मदत मिळेपर्यंत कर्जवसुलीला स्थगिती द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

मंत्री व अधिकाऱ्यांकडे प्रत पाठवली

गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनाची प्रत मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील (पालक व जलसंपदा मंत्री) तसेच उपविभागीय अधिकारी, संगमनेर यांना सुद्धा पाठविण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा पाहता शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांचा आक्रोश तीव्र

गेल्या काही वर्षांपासून दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आता सततचा मुसळधार पाऊस ही त्यांची परिस्थिती अधिकच बिकट करणारी बाब ठरत आहे. शेतकऱ्यांचा आत्मविश्वास डळमळीत होत असून शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!