“दिपक लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन उपाध्ये यांनी दाखवला एकजुटीचा निर्धार”

यवतमाळ (आझाद मैदान) : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
नेताजी नगर, यवतमाळ येथे मागील ६० ते ७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या उपेक्षित मांग-गारुडी समाजाच्या जमिनीच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आता राज्यभरातून समर्थनाची लाट उसळली आहे.
या उपोषणाचे नेतृत्व चंदन सुदामराव हातागडे करत असून, समाजाच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या “हक्काच्या आणि कायमस्वरूपी जमिनीच्या पट्ट्यांसाठी” मागणी केली जात आहे. या योग्य आणि न्याय्य मागणीला आता मांग गारुडी समाज युवा परिवर्तन सामाजिक सेवा संस्थेने आपला ठाम पाठिंबा जाहीर केला आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.दिपक नारायण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्य उपाध्यक्ष मा.सचिन विठ्ठल उपाध्ये यांनी या उपोषणाला जाहीर आणि एकजुटीचा पाठिंबा दिला आहे.
त्यांनी समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करत सांगितले की —
“६० वर्षांपासून अन्याय सहन करणाऱ्या मांग-गारुडी समाजाचा आवाज आता थांबणार नाही. आम्ही प्रशासनाकडे मागणी करतो की, या मागासवर्गीय समाजाला तातडीने त्यांच्या हक्काच्या जमिनींचे पट्टे द्यावेत. अन्यथा हा आंदोलनाचा आवाज राज्यभर पोहोचेल.”
या लढ्याला आता विविध जिल्ह्यांतील सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि समाजबांधवांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, आझाद मैदान परिसरात एकतेचे आणि न्यायासाठीच्या निर्धाराचे वातावरण निर्माण झाले आहे.
आमरण उपोषणकर्ते चंदन हातागडे यांनी सांगितले की, “आमचा हा संघर्ष फक्त जमिनीपुरता मर्यादित नाही, तर हा आमच्या अस्तित्वाचा आणि स्वाभिमानाचा लढा आहे.”
या उपोषणात सहभागी सर्व मागासवर्गीय समाजबांधवांचे, कार्यकर्त्यांचे आणि पाठिंबा देणाऱ्या सर्व समाजप्रेमींचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.
