माळशिरस (सोलापूर) : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
माळशिरस येथील श्रीराम शिक्षण संस्थेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळा आणि समवेत झालेल्या राजकीय घडामोडींमुळे तालुक्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील आणि सौ. श्रीलेखाताई पाटील यांच्यासह माळशिरस तालुक्यातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.

कार्यक्रमाला उपस्थित राहताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलताना माळशिरस तालुक्यातील सिंचन प्रकल्पांना आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. त्यांनी औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असेही स्पष्ट केले. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार आणि कौशल्य विकास हा समाजपरिवर्तनाचा प्रभावी मार्ग असून श्रीराम शिक्षण संस्थेने गेल्या काही वर्षांत केलेली वाटचाल कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.

भाजपात झालेल्या या मोठ्या पक्षप्रवेशाचे स्वागत करताना मंत्री, पदाधिकारी आणि विविध स्तरांवरील नेत्यांनी व्यक्त केले की, या प्रवेशामुळे माळशिरस तालुक्यातील भाजपा संघटना अधिक बळकट होणार असून आगामी काळात विकास कामांना गती मिळणार आहे.

या कार्यक्रमाला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, मा. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, मा. आमदार राम सातपुते, तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
