अहिल्यानगर, दि. १३ — ग्रामीण भागात अचानक वाढलेल्या बिबट्यांच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक गावांमध्ये पाळीव जनावरांवर हल्ले, शेतशिवारात रात्री फिरणारे बिबटे, घरांच्या अंगणापर्यंत पोहोचलेली हालचाल यामुळे महिला, बालक आणि शेतकरी वर्ग मोठ्या दहशतीत सापडला आहे. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन व विकास समितीतून तब्बल ८ कोटी १३ लाख ४४ हजार रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती दिली आहे.
बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत असल्याने मागील दोन दिवसांपासून पालकमंत्री विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी, वनविभाग अधिकारी तसेच वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी सलग संपर्क ठेवत संकटाचा आढावा घेतला. वाढत्या धोक्याला रोखण्यासाठी वन विभागाला अतिरिक्त मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि रेस्क्यू उपकरणे उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. उपलब्ध निधीतून ३०० पिंजरे, ३०० ट्रॅप कॅमेरे तसेच जॅकेट, शूज, टॉर्च गन्स आणि संरक्षणात्मक किट यांसारखी रेस्क्यू साधने खरेदी केली जाणार आहेत. तसेच दुर्गम भागात तातडीने पोहोचण्यासाठी २२ रेस्क्यू वाहने खरेदी करण्याचे आदेशही प्रशासनास देण्यात आले आहेत. जिल्ह्यात तब्बल ११५० बिबटे असल्याची धक्कादायक माहिती मिळाल्यानंतर विशेष पकड मोहीम राबविण्यास सांगितले असून पकडण्यात आलेले बिबटे वनतारा येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला आहे.
ग्रामीण भागातील भीतीची परिस्थिती गंभीर असून अनेक गावांतील नागरिकांना रात्री बाहेर पडणे कठीण झाले आहे. शेतकरी रात्री शेतात जाण्यास घाबरत आहेत, महिला पाणी भरायला बाहेर जाण्यास टाळत आहेत, बालकांना घराबाहेर खेळू न देण्याची वेळ आली आहे. अहिल्यानगर, राहुरी, कोल्हार, संगमनेर सीमाभाग, शेवगाव, पारनेर या भागात “रात्री घराबाहेर पडणे म्हणजे जीवावर उदार होणे” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय परिस्थितीचे पुनर्मूल्यांकन करून, ज्याठिकाणी बिबट्यांची वर्दळ अधिक आहे त्या गावांना प्राधान्य देत पकड मोहीम आणि संरक्षणात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
नागरिकांचा जीव सर्वात महत्त्वाचा असून उपाययोजनांमध्ये कोणतीही ढिलाई चालणार नाही, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. बिबट्यांच्या वाढत्या दहशतीवर नियंत्रण आणण्यासाठी मंजूर झालेला ८ कोटींचा निधी ग्रामीण भागातील लोकांसाठी आश्वासक ठरणार असून ही कार्यवाही तातडीने आणि प्रभावीपणे राबवण्यावर प्रशासनाचा भर आहे.
