संगमनेर मध्ये महिला लाट; डॉ.मैथिली तांबे यांना प्रभागभेटींमध्ये प्रचंड प्रतिसाद

संगमनेर ता.२४ : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि उच्चशिक्षित डॉक्टर असलेल्या डॉ. मैथिली तांबे यांनी शहरातील प्रत्येक प्रभागात थेट नागरिकांशी संवाद साधण्याचा उपक्रम हाती घेतला असून, त्यांच्या या संवादफेरीला शहरवासियांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे महिलांच्या अडचणी-गरजा जाणून घेण्यासाठी घेतलेल्या गाठीभेटींमुळे डॉ. तांबे यांच्या मागे महिलांचा वाढता उत्साह आणि विश्वास दिसत आहे.

डॉ. तांबे या शहरातील प्रत्येक प्रभागात भेट देऊन महिलांचे शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, नोकरी, पायाभूत सुविधा यांसारख्या विविध अडचणी जाणून घेत आहेत. त्यांच्या प्रभागभेटींमध्ये महिलांची मोठ्या प्रमाणावर झालेली उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरत आहे. त्यांच्या संवेदनशील संवादामुळे आणि समस्यांकडे पाहण्याच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे महिलांचा त्यांच्यावरचा विश्वास अधिक दृढ होत चालला आहे.या भेटीदरम्यान त्या नागरिकांना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या काळात संगमनेरमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण विकासकामांची माहिती देखील देत आहेत.

आमदार सत्यजीत तांबे यांनी जाहीर केलेल्या संगमनेर 2.0 या दूरदर्शी संकल्पनेतील उपक्रमांबद्दलही डॉ. मैथिली तांबे नागरिकांना माहिती देत आहेत. जाहीरनाम्यानुसार शहरात शाश्वत विकास, स्मार्ट सुविधा, महिला- सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगार निर्मिती, आरोग्य-शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढविणे अशा अनेक महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार आहेत. राजकारणापलीकडे जाऊन सर्व नागरिकांना सहभागी करूनच शहराचा खऱ्या अर्थाने विकास व्हावा. प्रत्येक प्रभाग, प्रत्येक नागरिक यांचा सहभाग राहील, हे आमचे पहिले ध्येय आहे. महिलांबरोबरच डॉ. मैथिली या शहरातील ज्येष्ठ नागरिकांशीही भेटून त्यांचे अनुभव, अपेक्षा आणि सूचना जाणून घेत आहेत. त्यांच्या या साधेपणामुळे ज्येष्ठ नागरिकही त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधत आहेत.

डॉ. मैथिली तांबे उच्चशिक्षित डॉक्टर असल्याने आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक कल्याण विषयांवर त्यांची माहिती समृद्ध आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्यामध्ये एक व्यवस्थित विचार करणारी, जबाबदार आणि काम करण्याची क्षमता असलेली उमेदवार दिसत आहे. त्या ज्या-त्या प्रभागात भेट देतात, तिथे महिलांची उत्स्फूर्त गर्दी होत असून त्यांच्या प्रत्येक भेटीला सभोवतालचा परिसर उत्साहाने भरून जातो. शहरातील विकासकामांची माहिती, पुढील आराखडा आणि नागरिकांसोबतचा थेट संवाद यामुळे सध्या तरी डॉ. मैथिली तांबे यांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट चित्र शहरात दिसत आहे. आगामी निवडणुकीत शहराचा विकास, महिलांचा सहभाग आणि नव्या नेतृत्वाची निवड यावर भर देणाऱ्या नागरिकांमध्ये त्यांच्या नावाला विशेष आकर्षण आणि विश्वास मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!