वनखात्याच्या हलगर्जीपणावर शेतकऱ्यांचा संताप, तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी
दाढ खुर्द येथील काँग्रेसचे गटनेते किशोर जोशी यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क
संगमनेर : निर्भीड जनता न्यूज
संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील दाढ खुर्द (हनुमानवाडी) येथे मध्यरात्री बिबट्याने थेट गोठ्यात प्रवेश करून शेतकरी नितीन दिनकर पाबळे यांच्या कालवडीवर हल्ला केला. या हल्ल्यात कालवडीच्या मानेवर दाताने खोल जखमा झाल्या असून ती गंभीर जखमी झाली आहे.
घराशेजारी असलेल्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश करताच कुत्र्यांच्या आरडाओरडीने शेतकरी नितीन पाबळे यांना जाग आली. त्यांनी तत्काळ बिबट्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. मानवी हालचाल होताच बिबट्याने कालवडीला सोडून पळ काढला. त्यामुळे गोठ्यातील इतर गाई व वासरे थोडक्यात बचावली.
या घटनेची माहिती पाबळे यांनी तातडीने वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना मोबाईलवरून दिली. मात्र, रात्री उशिरापर्यंत कोणीही घटनास्थळी न पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. दाढ खुर्द व परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणावर संचार असून यापूर्वीही गुरे, कुत्रे तसेच माणसांवर हल्ल्याच्या घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
वन विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. उसासारखी उंच पिके असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांना शेती करणेही कठीण बनले आहे.
या पार्श्वभूमीवर दाढ खुर्द येथील काँग्रेसचे गटनेते किशोर जोशी यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. येत्या आठ दिवसांत बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, तातडीने पिंजरे लावावेत व ऊस व इतर मोठ्या पिकांची सखोल पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन निवेदन नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात वनमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे. याबाबत शेतकरी डॉ. राजेंद्र साळवे, दगडू साळवे, हरिभाऊ जोरी, शिवसेना अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे, रिपाई (ए) शाखाप्रमुख राजेंद्र जमदाडे, उपशाखाप्रमुख भाऊराव साळवे, शिवाजी भुसारी, ग्रामपंचायत सदस्य चेतन पर्वत, उपसरपंच सौ. राजेश्वरी सुनील जोशी, शंकर जोशी, रावसाहेब जमदाडे, तुकाराम जोरी, अशोक जोशी आदी शेतकरी व ग्रामस्थांनी तात्काळ बंदोबस्ताची मागणी केली आहे.
