मानवतेचा उबदार स्पर्श : कडाक्याच्या थंडीत रस्त्यावरील गरिबांसाठी मांग गारुडी समाज युवा परिवर्तन सामाजिक सेवा संस्थेचा ‘एक हात मदतीचा’ उपक्रम!

भिवंडी : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

“मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा” या उदात्त विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड देत मांग गारुडी समाज युवा परिवर्तन सामाजिक सेवासंस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भिवंडी शहरात कडाक्याच्या थंडीत रस्त्याच्या कडेला, उघड्यावर जीवन जगणाऱ्या गोरगरीब, बेसहारा नागरिकांसाठी मोफत ब्लँकेट वाटप करण्यात आले. थंडीने गारठलेल्या रात्रीत थोडीशी का होईना उब मिळावी, या संवेदनशील भावनेतून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

संस्थापक अध्यक्ष दिपक नारायण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व पदाधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम यशस्वी झाला. विशेषतः राजीव क्यातम व श्रीनिवास वेंगल यांच्या अमूल्य साथ व सहकार्यामुळे गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवता आला. शहरातील विविध ठिकाणी रस्त्याच्या कडेला झोपणाऱ्या वृद्ध, महिला, मजूर व निराधार व्यक्तींना ब्लँकेट देऊन त्यांना मायेचा आधार देण्यात आला.

या उपक्रमाबाबत बोलताना संस्थापक अध्यक्ष दिपक नारायण लोंढे यांनी सांगितले की, थंडीच्या महिन्यात उब ही केवळ सोय नसून जगण्यासाठीची गरज आहे. “देवानं दिलंय त्यातलं इतरांना देऊन पहावं; देव होता नाही आला तरी माणूस म्हणून जगावं,” या भावनेतून संस्थेने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला आहे. मदत स्वीकारताना अनेकांच्या डोळ्यात पाणी तर चेहऱ्यावर समाधान दिसून आले; हीच या उपक्रमाची खरी पावती असल्याचे स्वयंसेवकांनी नमूद केले.

या समाजोपयोगी कार्यात मांग गारुडी समाज युवा परिवर्तन सामाजिक सेवासंस्था, महाराष्ट्र राज्य यांचे राज्य उपाध्यक्ष सचिन विठ्ठल उपाध्ये यांचे विशेष सहकार्य लाभले. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी या उपक्रमासाठी आवश्यक समन्वय, मार्गदर्शन व पाठबळ पुरवले. त्यांच्या सहकार्यामुळे उपक्रम अधिक व्यापक व प्रभावी स्वरूपात राबविता आला.

संस्थेच्या वतीने भविष्यातही आरोग्य, शिक्षण, आपत्ती मदत, अन्नदान व गरिबांच्या मूलभूत गरजांसाठी असेच उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या परीने ‘एक हात मदतीचा’ पुढे केल्यास मानवी मूल्यांची जपणूक होईल आणि खऱ्या अर्थाने मानवतेचा विजय होईल, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.

दरम्यान, हे सामाजिक कार्य अधिक व्यापक प्रमाणात सुरू राहावे, जास्तीत जास्त गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचावा, यासाठी संस्थेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. आपणही या सामाजिक कार्यात हातभार लावू शकता. आपल्या परीने शक्य होईल अशी आर्थिक मदत संस्थेच्या खालील बँक खात्यावर जमा करता येईल किंवा थेट संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल.

बँक तपशील (देणगीसाठी):
Bank of India
Branch : Dhamankar Naka, Bhiwandi
Account Number : 2511021021000005
MICR Code : 400013167
IFSC Code : BKID0000251

थंडी, भूक, आजारपण अशा परिस्थितींशी झुंज देणाऱ्या निराधारांसाठी तुमची छोटीशी मदतही मोठा आधार ठरू शकते. एका रात्रीची उब, एका जीवाचे रक्षण आणि एका कुटुंबाच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करण्याची ताकद या मदतीत आहे. समाजातील प्रत्येकाने ‘एक हात मदतीचा’ पुढे केला, तर माणुसकीची ही चळवळ अधिक बळकट होईल आणि खऱ्या अर्थाने मानवतेचा विजय साजरा होईल, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना मांग गारुडी समाज युवा परिवर्तन सामाजिक सेवासंस्था, महाराष्ट्र राज्य यांचे राज्य उपाध्यक्ष सचिन विठ्ठल उपाध्ये यांनी भावनिक शब्दांत आपली भूमिका मांडली.

उपाध्ये म्हणाले की, “संघटना म्हणजे केवळ नाव किंवा पदांचा समूह नसून ती माणुसकी जपणारी एक जिवंत चळवळ आहे. समाजातील शेवटच्या घटकाच्या दुःखाशी आपलेपणाने जोडून घेणे, त्याच्या वेदनांवर फुंकर घालणे आणि संकटाच्या काळात खंबीरपणे उभे राहणे हेच आमच्या संघटनेचे खरे ध्येय आहे. कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर झोपणाऱ्या निराधारांना उब देताना आम्ही केवळ ब्लँकेट देत नाही, तर ‘तुम्ही एकटे नाही’ हा विश्वास देतो. मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानून आमची संघटना सातत्याने सामाजिक, शैक्षणिक व मानवतावादी कार्य करत आहे. ही चळवळ अधिक व्यापक व्हावी, समाजातील प्रत्येकाने यात सहभागी व्हावे, हीच माझी मनापासूनची इच्छा आहे.”

या शब्दांतून संघटनेची सामाजिक बांधिलकी, माणुसकीची जाणीव आणि समाजासाठी झटण्याची प्रामाणिक भावना ठळकपणे व्यक्त झाली.

तसेच उपाध्ये म्हणाले की, “दीपक नारायण लोंढे हे केवळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नाहीत, तर या संघटनेची आत्मा आहेत. समाजाच्या, गोरगरीब जनतेच्या वेदना स्वतःच्या मनात घेऊन त्या दूर करण्यासाठी अहोरात्र झटणारे, कृतीतून नेतृत्व करणारे आणि माणुसकीला सर्वोच्च स्थान देणारे नेतृत्व म्हणजे दीपक लोंढे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे, संवेदनशीलतेमुळे आणि निस्वार्थ सेवाभावामुळे आज ही संघटना विश्वासाने समाजासाठी, गोरगरीब, दिन दुबळ्या जनतेसाठी काम करत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मानवसेवेची ही चळवळ अधिक व्यापक होत असून समाजासाठी, गोरगरीब दिन दुबळ्या जनतेसाठी आशेचा किरण ठरत आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!