महामानवांच्या अपमानप्रकरणी ग्रामपंचायतीची दिलगिरी; संजय मुंतोडे यांचे उपोषण स्थगित!

शिबलापूर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

महामानवांच्या प्रतिमेच्या अपमानासंदर्भात उद्भवलेल्या वादानंतर अखेर ग्रामपंचायत शिबलापूर प्रशासनाने अधिकृत पत्रक काढत दिलगिरी व्यक्त केली आहे. या पत्रकात भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही, याची लेखी हमी देण्यात आली असून याची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते संजय मुंतोडे यांनी आजपासून सुरू होणारे आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिबलापूर परिसरात महामानवांच्या अपमानाच्या कथित प्रकारामुळे तीव्र संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, यासाठी संजय मुंतोडे यांनी आश्वी बुद्रुक पोलीस ठाण्यासमोर चार तासांचे ठिय्या आंदोलन करण्यात केले होते. मात्र त्या वेळी ठोस कारवाई न झाल्याने निवेदन देऊन उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.

दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत ग्रामपंचायत कार्यालय, शिबलापूर यांनी लेखी पत्राद्वारे संबंधित प्रकरणाबाबत दिलगिरी व्यक्त केली. सदर पत्रकात प्रशासनाकडून झालेल्या त्रुटी मान्य करण्यात आल्या असून समाजभावना दुखावल्या गेल्याबद्दल खेद व्यक्त करण्यात आला आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीकडून आलेल्या या अधिकृत भूमिकेनंतर सामाजिक सौहार्द आणि शांततेचा विचार करत संजय मुंतोडे यांनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून महामानवांच्या सन्मानासाठी आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी आहे. प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलल्यास संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारणे हेच लोकशाहीचे खरे स्वरूप असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या संपूर्ण प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर प्रशासनाची जबाबदारी, सामाजिक संवेदनशीलता आणि महामानवांच्या सन्मानाबाबतची जाणीव पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नागरिकांमध्येही या निर्णयामुळे दिलासा व्यक्त करण्यात येत असून, पुढील काळात प्रशासनाने अधिक जागरूक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!