हमीभाव वाढ व केंद्र शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान!
पारनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत केंद्र व राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने पारनेर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघामध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या सोयाबीन खरेदी केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री तथा महसूल मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.या उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे केंद्र अत्यंत दिलासादायक ठरणार असून, बाजारातील चढ-उतार आणि व्यापाऱ्यांच्या मनमानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.उद्घाटनानंतर पालकमंत्री विखे पाटील यांनी स्वतः सोयाबीन विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.

शेतकऱ्यांच्या अडचणी, उत्पादन खर्च, बाजारभाव, वाहतूक समस्या तसेच हमीभावाबाबतच्या अपेक्षा त्यांनी सविस्तरपणे जाणून घेतल्या. शासनाच्या खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता राहील आणि कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.विखे पाटील म्हणाले की, केंद्र शासनाच्या सोयाबीन खरेदी निर्णयामुळे आणि हमीभाव वाढीमुळे उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेती ही देशाची व राज्याची अर्थव्यवस्था मजबूत करणारी कणा असून, शेतकऱ्यांना योग्य दर मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, यासाठी केंद्र व राज्य शासन कटिबद्ध असल्याचा ठाम संदेश त्यांनी दिला.

पारनेर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाने सुरू केलेल्या या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारी सहकार चळवळ मजबूत व्हावी, यासाठी शासन स्तरावरून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. संघाच्या कार्यातील अडचणी, पायाभूत सुविधा, आर्थिक बाबी किंवा प्रशासकीय प्रश्न असतील तर ते सोडवण्यासाठी शासन सदैव सहकार्य करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या खरेदी केंद्रामुळे पारनेर तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना थेट शासकीय हमीभावाने विक्रीची संधी उपलब्ध झाली असून, मध्यस्थांची साखळी कमी होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शेतकरी व पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या या निर्णयाबद्दल आभार व्यक्त करत, अशीच धोरणात्मक साथ भविष्यातही मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

