दिनांक.17/03/2016 बुधवार
वडगावपान : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
तालुक्यातील वडगाव पान येथे शाळा सुटल्यानंतर घरी जात असलेल्या अवघ्या १३ वर्षीय विद्यार्थिनीवर अज्ञात इसमाने ॲसिड फेकून हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.१७) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास संबंधित विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात होती. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या एका अज्ञात तरुणाने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिला अडवले आणि अचानक तिच्यावर ॲसिड फेकून घटनास्थळावरून पळ काढला. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत तिला तातडीने प्रवरा रुग्णालयात दाखल केले.
पीडित मुलीची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असून तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. आई गरीब असल्याने ती मामाकडे राहून शिक्षण घेत होती. अशा निरागस मुलीवर झालेल्या या भ्याड हल्ल्यामुळे समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी रुग्णालयात जाऊन जखमी मुलीची भेट घेतली व कुटुंबीयांना धीर दिला. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्याशी संपर्क साधून आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली. जखमी मुलीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च एसएमबीटी सेवाभावी संस्थेकडून उचलला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनीही तातडीने रुग्णालयात भेट देत मुलीची चौकशी केली व कुटुंबीयांना आधार दिला.त्या म्हणाल्या,“अवघ्या १३ वर्षांच्या चिमुकलीवर ॲसिड हल्ला होणे ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने कडक कायदे करणे गरजेचे आहे. अशा गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.”
दरम्यान, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. “गुन्हेगाराला कोणताही जात-धर्म नसतो, तो केवळ गुन्हेगार असतो. अशा अमानुष कृत्य करणाऱ्या आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संगमनेर पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. या घटनेमुळे तालुक्यात संताप व्यक्त होत असून आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
