“शिबलापूर परिसरात अवैध मुरूम उत्खननाचा धुमाकूळ ! प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह?”

दिनांक. 24/03/2026 मंगळवार

शिबलापूर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

तालुक्यातील शिबलापूर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम उत्खनन व विनापरवाना वाहतूक सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय ताबाजी मुन्तोडे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी उपविभागीय अधिकारी, संगमनेर यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, शिबलापूर व परिसरातील काही गावांमधून शासनाची कोणतीही परवानगी न घेता मुरूमाचा उपसा केला जात असून, त्याची वाहतूक विनानंबर प्लेटच्या वाहनांद्वारे केली जात आहे. या वाहनांवर ताडपत्री किंवा अन्य सुरक्षेची उपाययोजना न करता खुलेआम वाहतूक होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.शिबलापूर चौफुली मार्गे ही वाहतूक सातत्याने सुरू असून, या मार्गावर नागरिक, महिला व शालेय विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे मुरूम व दगड रस्त्यावर सांडत असून, त्यामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी लहान-मोठे अपघात घडल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, संबंधित मंडळ अधिकारी व सर्कल कार्यालयासमोरूनच ही वाहतूक सुरू असतानाही कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात काही शासकीय कर्मचाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत संजय मुन्तोडे यांनी सांगितले की, “गेल्या काही दिवसांपासून परिसरात अवैध मुरूम व वाळूची वाहतूक सुरू आहे. विनानंबर प्लेटच्या वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागांनी तातडीने कारवाई करावी, अन्यथा संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येईल.” तक्रारदाराने प्रशासनाकडे अवैध उत्खनन तात्काळ थांबवून संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणाचा पंचनामा करून विनानंबर प्लेटच्या वाहनांना जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या तक्रारीची प्रत जिल्हाधिकारी, जिल्हा गौण खनिज अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच पंचायत समिती यांना देण्यात आली आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास शिबलापूर चौफुली येथे ‘रस्ता रोको’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!