“पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांचे ठोस मार्गदर्शन; ‘सावध गाव–सुरक्षित गाव’ मोहिमेला वेग”

दिनांक.21/04/2026 मंगळवार

आश्वी : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर, आश्वी बुद्रुक आणि परिसरात अलीकडे वाढलेल्या घरफोड्या व सशस्त्र चोऱ्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रतापपूर येथे नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी ग्रामस्थांना सुरक्षा विषयक मोलाचे मार्गदर्शन करत सतर्कतेचा इशारा दिला.

अलीकडे उंबरी बाळापूर व आश्वी बुद्रुक परिसरात पहाटे सशस्त्र चोरट्यांनी एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या करून अंदाजे १० ते १५ तोळे सोने व सुमारे सव्वा दोन लाखांची रोकड लंपास केली. या घटनेत एका वृध्द महिलेच्या कानातील दागिने हिसकावल्याने ती गंभीर जखमी झाली. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना पोलीस निरीक्षक शिरसाठ यांनी नागरिकांना काही सोपे पण प्रभावी उपाय सांगितले. झोपण्यापूर्वी घराच्या दरवाज्याला परात उभी लावावी, जेणेकरून कोणी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्यास परात पडून आवाज होईल आणि घरातील सदस्य तत्काळ सावध होतील. तसेच घरात मोठ्या प्रमाणात रोकड किंवा मौल्यवान दागिने ठेवणे टाळावे, अनोळखी व्यक्ती किंवा संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ शेजाऱ्यांना व पोलिसांना कळवावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही अप्रमाणित माहिती पुढे पाठवू नये, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. गावातील प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागून एकमेकांशी संपर्क ठेवत सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक दिपक बर्डे यांनीही नागरिकांना मार्गदर्शन करत सांगितले की, “गावाची सुरक्षा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची आहे.” रात्री घरांची कुलपे व्यवस्थित लावणे, शेजाऱ्यांमध्ये समन्वय ठेवणे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल तात्काळ पोलिसांना कळवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांच्या सहकार्यामुळेच अशा गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीदरम्यान ग्रामस्थांनीही पोलिसांविषयी आपले मत स्पष्टपणे मांडले. कोणतीही घटना घडताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदत करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. तसेच गावांमध्ये नियमित गस्त, पोलिसांचा त्वरित प्रतिसाद आणि नागरिकांशी सातत्याने संवाद यामुळेच सुरक्षिततेची भावना अधिक बळकट होईल, असे मत मांडण्यात आले. काही नागरिकांनी “पोलिसांनी वेळेवर प्रतिसाद दिल्यास गुन्हे रोखणे अधिक सोपे होईल,” असेही नमूद केले.

पोलिसांकडून परिसरात गस्त वाढवण्यात आली असून, तपासासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. नागरिकांनीही ‘आपलं गाव–आपली जबाबदारी’ या भावनेतून जागरूक राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या संयुक्त प्रयत्नातूनच वाढत्या घरफोड्या आणि चोऱ्यांवर आळा बसू शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!