दिनांक.22 फेब्रुवारी 2026 बुधवार
“जनजागृती, पर्यावरण संरक्षणासाठी जलयात्रा प्रभावी ठरणार – प्रा.राम शिंदे”
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’ हा उपक्रम जलसंवर्धन, सांस्कृतिक वारसा आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम घडविणारा ठरणार असून, या माध्यमातून पाणी व्यवस्थापनाच्या कार्याला नवसंजीवनी देण्याचा संकल्प करण्यात आल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. ही जलयात्रा विविध भागात जाऊन जनसंवाद साधत व्यापक जनजागृती निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चौंडी येथे आयोजित नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे, अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे, अलका अहिरराव, रवी अनासपुरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. विखे पाटील यांनी सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पाणीसंवर्धन, तळ्यांचे नूतनीकरण, गावतळी निर्माण तसेच मंदिरांच्या जीर्णोद्धारातून समाजासाठी भरीव कार्य केले. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि जलसंवर्धनाच्या कामांना चालना देण्यासाठी या जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पाण्याचे महत्त्व पटवून देत जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरेल. राज्यातील विविध नद्यांचे जल एकत्र आणून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक या यात्रेतून साकार होणार आहे.
दि. २५ एप्रिल २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गोदावरीच्या उगमस्थानातून जलकलश घेऊन यात्रेला प्रारंभ होणार आहे. ही यात्रा नाशिक, सिन्नर मार्गे संगमनेर येथे पहिला मुक्काम करेल. त्यानंतर लोणीमार्गे शिर्डी येथे पोहोचेल. चौंडी येथून निघालेली दुसरी जलयात्रा अहिल्यानगर येथे पहिला व शिर्डी येथे दुसरा मुक्काम करेल. तिसऱ्या दिवशी दोन्ही यात्रा एकत्र येऊन संभाजीनगरमार्गे घृष्णेश्वर येथे मुक्कामी राहतील. चौथ्या दिवशी कन्नड–चाळीसगाव मार्गे धुळे येथे मुक्काम होईल. तर दि. २९ एप्रिल २०२६ रोजी माहेश्वर येथे मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जलकलश स्वीकारल्यानंतर यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे.
या संपूर्ण यात्रेत आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचे सांगत डॉ. विखे पाटील यांनी नमूद केले की, राज्यातील सुमारे ३० प्रमुख नद्यांचे जलकलश शिर्डी येथे एकत्र आणले जाऊन पुढे माहेश्वर येथे विसर्जित करण्यात येणार आहेत. वारकरी संप्रदायाचाही या यात्रेत सहभाग असणार असून, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा व पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिर्डी येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.

सभापती प्रा. राम शिंदे यांनी जलसंवर्धन, पाणी व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी ही जलयात्रा प्रभावी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. दि. २५ एप्रिल रोजी चौंडी येथून जलयात्रेला प्रारंभ होणार असून, दुसरी यात्रा त्र्यंबकेश्वर येथून निघणार आहे. चौंडी येथील यात्रेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती लाभणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीची माती आणि सीना नदीतील पवित्र जल घेऊन यात्रा मार्गस्थ होणार असून, ही ऐतिहासिक घटना ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीत यात्रेचे नियोजन, मार्गक्रमण, जनसहभाग, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध विभागांमधील समन्वयाबाबत सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
