दिनांक.22/04/2026 बुधवार
संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
संगमनेर तालुक्यात अलीकडे डोंगरांवर लागणाऱ्या आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असून पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करत, दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दंडकारण्य अभियानाच्या प्रकल्प प्रमुख सौ. दुर्गाताई तांबे यांनी दिला आहे.
मागील दोन दशकांपासून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेने सुरू असलेले दंडकारण्य अभियान, जयहिंद लोकचळवळ व ग्रामस्थांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड आणि संवर्धनाचे कार्य सुरू आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत डोंगरांवर लागणाऱ्या आगीमुळे हजारो झाडांचे नुकसान होत असल्याचे समोर आले आहे.
तालुक्यातील खांडगाव परिसरातील कपारेश्वर डोंगरावर वारंवार लागलेल्या आगीत शेकडो वृक्ष जळाल्याची माहिती देताना, तक्रारी करूनही दोषींवर कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. उंच डोंगरांवर आग विझवणे अत्यंत कठीण असून, पाण्याअभावी आणि वाऱ्यामुळे आग वेगाने पसरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सायखिंडी परिसरातील डोंगरावर तसेच मालदाड येथील मच्छिंद्रनाथ गडावरही आगीच्या घटना घडल्या असून, स्थानिक तरुणांनी जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अलीकडेच सप्तशृंगी गड परिसरात लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात लावलेली झाडे बाधित झाली असून, या घटनांमुळे पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसत असल्याचे तांबे यांनी सांगितले.
“झाडे लावणे आणि त्यांचे संवर्धन करणे ही दीर्घकालीन आणि कष्टाची प्रक्रिया आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे केवळ झाडांचेच नव्हे, तर संपूर्ण पर्यावरणाचे नुकसान होत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, प्रशासनाने या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देत प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, तसेच नागरिकांनीही डोंगर पेटविणे, कचरा जाळणे किंवा निष्काळजीपणे वागणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असून, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
