“सीना नदीसाठी विखे पाटील अ‍ॅक्शन मोडमध्ये; अतिक्रमण हटवून युद्धपातळीवर संवर्धनाची मोहीम!”

दिनांक. 10 जून 2026. बुधवार. अहिल्यानगर – निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रत्यक्ष पाहणी; अतिक्रमित वीटभट्ट्यांवर कारवाईचे संकेत, नदीचे नैसर्गिक स्वरूप जपण्यासाठी व्यापक आराखडा

अहिल्यानगर शहराची जीवनवाहिनी मानली जाणारी सीना नदी पुन्हा स्वच्छ, प्रवाही आणि अतिक्रमणमुक्त करण्यासाठी व्यापक स्तरावर कामे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा विभागाचे मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. नदी संवर्धन, अतिक्रमण निर्मूलन, नदीपात्र रुंदीकरण आणि पर्यावरणीय संतुलन राखण्याच्या दृष्टीने प्रशासनाने युद्धपातळीवर नियोजन सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सीना नदीच्या हद्द निश्चितीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह भेट दिली. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतीताई गाडे, उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या आढावा बैठकीत नदीपात्रातील अतिक्रमणे, नदी संवर्धनासाठीची प्रस्तावित कामे, नाल्यांचे प्रवाह, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदीच्या नैसर्गिक स्वरूपाच्या जतनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे सीना नदीच्या पात्रावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असून अनेक ठिकाणी नदीचे मूळ स्वरूप बाधित झाले आहे. या पार्श्वभूमीवर नदीपात्र रुंदीकरण आणि अतिक्रमण निर्मूलनासाठी टप्प्याटप्प्याने कामे राबविण्यात येणार आहेत.

त्यांनी पुढे सांगितले की, पहिल्या टप्प्यात सुमारे तीन किलोमीटर परिसरातील अतिक्रमणे हटवून नदीपात्र रुंदीकरणासाठी यापूर्वी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. आता पुढील टप्प्यात संपूर्ण नदीपात्राचा व्यापक आराखडा तयार करून सुमारे १४ ते १५ किलोमीटर परिसरात आवश्यक ती कार्यवाही केली जाणार आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत राहणार असून विविध विभागांच्या समन्वयातून कामे पूर्ण केली जातील. नदी संवर्धनाच्या दृष्टीने शहरातील प्रमुख नाल्यांचे प्रवाह सुरळीत करणे देखील आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. काही ठिकाणी अतिक्रमणांमुळे नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह प्रभावित झाल्याचे निदर्शनास आले असून त्यासाठी नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी अतिक्रमणमुक्तीची कारवाई करून नाले पुन्हा प्रवाही करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

महानगरपालिकेकडून नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. सांडपाणी पूर्णपणे प्रक्रिया करूनच नदीमध्ये सोडले जावे, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. विद्यमान सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता अपुरी असल्यास अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले. नदी संवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणास चालना मिळण्याबरोबरच नागरिकांसाठी स्वच्छ आणि आकर्षक सार्वजनिक जागा विकसित करण्याचाही प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. नदी परिसरातील विकासकामे करताना पर्यावरणीय निकषांचे पालन करण्यात येईल आणि नदीचे नैसर्गिक स्वरूप अबाधित ठेवण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सीना नदी संवर्धनाच्या या उपक्रमाकडे शहरवासीयांसह पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांचे लक्ष लागले असून प्रस्तावित कामांमुळे नदीच्या पुनरुज्जीवनाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!