“यशोधनच्या पाठपुराव्याला मोठे यश; संगमनेर तालुक्यात ३०० नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून हजारो शेतकरी व नागरिकांना दिलासा!”

दिनांक.10 जून 2026. बुधवार. संगमनेर – निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वीज समस्यांवर प्रभावी उपाय; जळालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या ठिकाणी नव्याने उभारणी, शेती व घरगुती वीजपुरवठ्याला मिळाला नवा आधार

संगमनेर तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वीज समस्यांवर मोठा दिलासा देणारी महत्त्वपूर्ण कार्यवाही यशोधन जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात तसेच आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तालुक्यात जळालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या ठिकाणी तब्बल ३०० नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले असून, यामुळे हजारो शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संगमनेर तालुका हा जिल्ह्यातील सर्वाधिक विस्तीर्ण तालुक्यांपैकी एक मानला जातो. तालुक्यातील १७१ गावे आणि २५८ वाड्या-वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती, दुग्धव्यवसाय आणि ग्रामीण जीवनाचा गाडा वीजपुरवठ्यावर अवलंबून आहे. मागील काही महिन्यांत वाढलेल्या तापमानामुळे विजेचा वापर लक्षणीयरीत्या वाढला. शेतीसाठी पाणी उपसा, घरगुती उपकरणांचा वापर आणि वाढलेला लोड यामुळे अनेक भागांतील ट्रान्सफॉर्मर जळण्याच्या घटना घडल्या. परिणामी अनेक गावांमध्ये वीजपुरवठा विस्कळीत होऊन शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.

या पार्श्वभूमीवर विविध गावांतील शेतकरी आणि नागरिकांनी यशोधन जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्या समस्या मांडल्या. प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत यशोधन कार्यालयाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश मिळत तालुक्यातील विविध भागांत नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर होऊन त्यांची उभारणी करण्यात आली.

कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात आणि इंद्रजीतभाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयात मागील दहा वर्षांपासून स्वतंत्र वीज समस्या निवारण कक्ष कार्यरत आहे. या कक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विजेच्या तक्रारी, जळालेले ट्रान्सफॉर्मर, कमी दाबाचा वीजपुरवठा, नवीन जोडण्या आणि इतर तांत्रिक समस्यांबाबत सातत्याने पाठपुरावा केला जातो.

तालुक्यात बसविण्यात आलेल्या नवीन ट्रान्सफॉर्मरमध्ये ६३ केव्ही आणि १०० केव्ही क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरचा समावेश असून, त्यांची उभारणी तळेगाव, साकुर, वडगाव पान, जोर्वे, धांदरफळ, आश्वी, घुलेवाडी, समनापूर आणि इतर अनेक गावांमध्ये करण्यात आली आहे. यामुळे शेती पंपांना नियमित वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार असून घरगुती वीजपुरवठाही अधिक सुरळीत होणार आहे.

जळालेल्या ट्रान्सफॉर्मरमुळे अनेक भागांतील शेतकऱ्यांचे पिकांना पाणी देण्याचे नियोजन विस्कळीत झाले होते. उन्हाळ्याच्या काळात तसेच आगामी हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक गंभीर बनली होती. नव्याने बसविण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरमुळे शेतीसाठी आवश्यक वीजपुरवठा सुरळीत होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

विशेषतः लोहारे येथील कदम, अभंग आणि पवार वस्ती परिसरात १०० केव्ही क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्यात आला. यामुळे त्या भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध झाल्यानंतर संबंधित गावांतील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात तसेच यशोधन कार्यालयाचे आभार व्यक्त केले. यावेळी हौशीराम सोनवणे, संजय साहेबराव पोकळे, राजहंस ट्रान्सपोर्टचे संचालक राजहंस बाळासाहेब कारभारी पोकळे, रेवणनाथ कदम, अरुण पोकळे, डॉ. संदीप पोकळे, बापू पवार, नवनाथ कदम, दिनकर पोकळे, शांताराम कदम, विजय रणमळे, किसन रणमळे, अगस्ती साळवे, यशोधन कार्यालयाचे वीज विभाग प्रमुख योगेश पोकळे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

“शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविणे हीच आमची प्राथमिकता आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून विविध प्रश्न सोडवले जातात. गावागावांत जळालेले ट्रान्सफॉर्मर नव्याने बसविण्यात आल्याने शेतकऱ्यांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे.”

— डॉ. जयश्रीताई थोरातअध्यक्ष, संगमनेर तालुका युवक काँग्रेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!