अवैध धंद्यांवर तोफ… अहिल्यानगर पोलिसांची ऐतिहासिक मोहीम सुरू!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):
जिल्ह्यातील अहिल्यानगर उपविभागात उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर, संतोष खाडे यांनी आपल्या धडाडीच्या कार्यशैलीने पोलिस खात्याला नवसंजीवनी दिली आहे. गुन्हेगारीवर आक्रमक पवित्रा घेऊन त्यांनी अवघ्या काही महिन्यांत अवैध धंद्यांचे उच्चाटन, गुन्हेगार टोळ्यांचे नियंत्रण, आणि नागरिकांच्या मनात पोलिसांबद्दलचा विश्वास निर्माण केला आहे. त्यांच्या कामगिरीमुळे संपूर्ण जिल्ह्यात खाडे यांच्याविषयी अभिमान, आदर आणि चर्चेचं वातावरण निर्माण झालं आहे.
गुन्हेगारीविरोधात झिरो टॉलरन्स – कडक कारवाईचा धडाका
DYSP खाडे यांच्या नेतृत्वात अवैध दारू विक्री, मटका, जुगार, गांजा व अन्य अमली पदार्थांचा साठा, बेकायदा गुन्हेगारी टोळ्या, आणि महिलांविरोधातील गुन्हे यावर थेट कारवाई करण्यात आली.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमांमुळे, गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचा वचक प्रस्थापित झाला असून, गुन्हेगारी जगतात खळबळ माजली आहे.गुन्हेगारांच्या अड्ड्यांवर अचानक धाड टाकणे, ठोस गुप्त माहितीच्या आधारे अचूक अंमलबजावणी करणे, आरोपींना गजाआड करणे आणि कारवाईनंतर ती माहिती पारदर्शकपणे जनतेपर्यंत पोहोचवणे, ही त्यांची शैली विशेषत्वाने उल्लेखनीय ठरते.
गुन्हेगारांमध्ये धडकी, तर नागरिकांमध्ये दिलासा
खाडे साहेबांच्या कारवायांमुळे एकीकडे गुन्हेगारांचे थरकाप उडाले असून ते भूमिगत झालेत, तर दुसरीकडे सामान्य नागरिकांच्या मनात एक विश्वास निर्माण झाला आहे –”आता आपल्यासाठी पोलिस मैदानात आहेत, कायदा जागा आहे!”काही ठिकाणी स्थानिक गुन्हेगारांचे राजकीय पाठबळ, सामाजिक दबाव असतानाही, खाडे यांनी न्यायप्रिय आणि निर्भय भूमिकेतून कुणाचीही गय केली नाही.यामुळे अनेक सामान्य कुटुंबांमधून पोलीस दलाबाबत सकारात्मक भावना निर्माण झालेली आहे.
सामाजिक सहभाग आणि जनजागृतीच्या मोहिमा
DYSP खाडे केवळ गुन्हेगारी विरोधातच काम करत नाहीत, तर समाज प्रबोधनाच्या कामातही ते तितकेच अग्रभागी आहेत.त्यांनी अनेक शाळा-महाविद्यालयांत जाऊन विद्यार्थ्यांना कायद्याचे भान दिले. वाहतूक जनजागृती सप्ताह, महिला सुरक्षाविषयी मार्गदर्शन, व्यसनमुक्ती मोहिमा, वॉचिंग स्कीमसारख्या माध्यमांतून त्यांनी ‘पोलीस = सुरक्षा’ ही प्रतिमा लोकांमध्ये ठामपणे रुजवली आहे.”पोलीस तुमच्या दारी”, “सामुदायिक संवाद सत्र”, “तरुणांशी थेट संवाद”, अशा कार्यक्रमांमधून खाडे साहेबांनी पोलीस आणि समाज यांच्यामधील दरी मिटवण्याचे कार्य सुरू केले आहे.
धोरणे स्पष्ट – कायद्यासमोर कोणीही मोठा नाही!
खाडे यांची भूमिका स्पष्ट आहे – “गुन्हेगार कोणताही असो – त्याची जात, धर्म, राजकीय ओळख महत्त्वाची नाही. कायदा सर्वांसाठी सारखा आहे, आणि तो लागू होणारच!”ही भूमिका त्यांनी अंमलात आणली आहे. या तत्वावर त्यांनी अनेक दबाव, टीका आणि अडथळ्यांनाही सामोरे जाताना कधीही गुन्हेगारांना सवलत दिली नाही.
पोलीस खात्याची प्रतिमा उजळवणारे अधिकारी
DYSP संतोष खाडे हे नव्या पिढीतील कर्तव्यनिष्ठ, लोकाभिमुख, शिस्तप्रिय आणि लोकसंपर्क साधणारे अधिकारी म्हणून ओळखले जात आहेत.त्यांच्या नेतृत्वात अहिल्यानगर विभागात अनेक गुन्हेगारी घटना रोखल्या गेल्या, शांतता राखली गेली आणि कायद्याचा प्रभाव पुन्हा प्रस्थापित झाला.त्यांच्या कामगिरीमुळे महाराष्ट्र पोलीस दलाचा खाकी गणवेश हा केवळ अधिकाराचा नाही, तर लोकसेवेचा आणि विश्वासाचा प्रतीक ठरला आहे.
