प्रवरा कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या साकारली आधुनिक नर्सरी – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

लोणी (प्रतिनिधी) :

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एक अभिनव नर्सरी प्रकल्प साकारला असून, या नर्सरीचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी मंत्री विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांनी उभारलेल्या आधुनिक नर्सरी प्रकल्पाचे मन:पूर्वक कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अनुभवांची आणि प्रयोगशीलतेची प्रशंसा करताना म्हटले, “कृषी शिक्षण ही केवळ पुस्तकी न राहता प्रत्यक्ष प्रयोगांमधून घडली पाहिजे. आणि प्रवरा कृषी महाविद्यालयाने हे उत्कृष्ट उदाहरण घडवले आहे.”

या नर्सरी प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतीत वापरता येतील असे तंत्रज्ञान, बियाणे उत्पादन, रोपवाटिका व्यवस्थापन आणि नवीन संशोधनाचा लाभ होणार आहे. ही नर्सरी शैक्षणिक प्रयोगशाळा आणि शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक केंद्र म्हणूनही कार्य करणार आहे.

या कार्यक्रमात माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील, कृषी संचालक डॉ. उतमराव कदम, तसेच प्रवरा परिवारातील इतर संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, शेतकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील यांनी शेवटी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या अशा प्रयोगशीलतेमुळेच कृषी क्षेत्रात नवे क्षितिज खुलत आहे. सरकारच्या कृषी धोरणात अशा प्रकल्पांचे स्थान आणखी बळकट करण्यात येईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!