फक्त फलक नव्हे… थोरातांच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या!

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभेच्छा फलकावर छेडछाड – संगमनेर तालुक्यात संतापाची लाट

संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील महादेव मंदिरासमोर लावण्यात आलेल्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे आणि डॉ. जयश्री थोरात यांच्या शुभेच्छा फलकाची अज्ञात समाजकंटकांनी छेडछाड केल्याची खळबळजनक घटना घडली. या प्रकारामुळे तालुक्यात संतापाची लाट उसळली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

संगमनेर तालुका नेहमीच शांततेचा, सुसंस्कृततेचा आणि सामाजिक सौहार्दाचा आदर्श मानला जातो. मात्र, मागील काही महिन्यांपासून काही असामाजिक प्रवृत्ती तालुक्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत आहे. या फलकावरील छेडछाडीची घटना म्हणजे या विकृत मानसिकतेचे स्पष्ट उदाहरण ठरते.

फलकाची छेडछाड झाल्याचे लक्षात येताच मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते घटनास्थळी जमा झाले. तसेच यशोधन कार्यालयात देखील कार्यकर्त्यांची गर्दी झाली. परिस्थिती अधिक तणावपूर्ण होऊ नये म्हणून इंद्रजीत थोरात यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

या घटनेची गंभीर दखल घेत तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सांगितले की, “संगमनेर तालुक्याची सुसंस्कृत परंपरा काही विकृत प्रवृत्ती बिघडवू पाहत आहेत. जातीभेदाचे राजकारण करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा समाजकंटकांवर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे.”

घटनास्थळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये निलेश थोरात, महेश थोरात, सागर गायकवाड, पोपट थोरात, अनिस तांबोळी, सुनील थोरात, अरुण कुळधरण, नितीन गायकवाड, रोहित गायकवाड, अभिजीत थोरात, गणेश गडगे आणि गणेश थोरात यांचा समावेश होता. सर्वांनी एकमुखाने या प्रकाराचा निषेध करत प्रशासनाकडे त्वरित कारवाईची मागणी केली.

युवक काँग्रेसचा इशारा – दोन दिवसांत अटक न झाल्यास रस्ता रोको

या प्रकारावर प्रतिक्रिया देताना युवक काँग्रेसचे निलेश थोरात म्हणाले, “जर संबंधित समाजकंटकांना दोन दिवसांत अटक केली गेली नाही, तर युवक काँग्रेसकडून भव्य रस्ता रोको आंदोलन छेडले जाईल. आणि या आंदोलनाची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील.”

सोशल मीडियावर तीव्र निषेधाची लाट

फलकावर छेडछाडीची बातमी समोर येताच सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नागरिकांनी या प्रकाराचा निषेध करत प्रशासनाला कठोर पावले उचलण्याचे आवाहन केले. “संगमनेरचा संयम राखला गेला, पण जर तो संपला, तर त्याची जबाबदारी संपूर्णपणे प्रशासनावर राहील,” असा इशाराही अनेक नागरिकांनी आपल्या पोस्टमधून दिला आहे.

संगमनेर तालुक्यात शांततेचा आणि सुसंस्कृततेचा वारसा कायम राखण्यासाठी अशा विकृत प्रवृत्तींच्या विरोधात वेळीच कडक पावले उचलणे गरजेचे झाले आहे. नागरिकांचा संताप हा फक्त भावनांचा उद्रेक नसून, सामाजिक सलोख्याच्या रक्षणासाठी दिला जाणारा इशाराच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!