आश्वी बुद्रुक (प्रतिनिधी) : सामाजिक न्याय, श्रमिकांचे हक्क, वंचितांचे प्रतिनिधित्व करणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावात दिनांक ५ ऑगस्ट २०२५ मंगळवार रोजी उत्साहात आणि अभिमानाने कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला स्पेशल ऑलिम्पिक अहिल्यानगरच्या अध्यक्षा व उत्तर महाराष्ट्र समन्वयक सौ. धनश्रीताई विखे पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात धनश्रीताई विखे पाटील यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करून करण्यात आली. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात साठेंच्या जयघोषात अभिवादन केले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना आणि भाषणांना सुरुवात झाली.

कार्यक्रमात बोलताना धनश्रीताई विखे पाटील म्हणाल्या की, “साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येथे येण्याचा योग आला, हे माझे भाग्य आहे. आज येथे उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी आणि चिमुकल्यांची एकी व उत्साह पाहून मन खरंच आनंदित झालं आहे. अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी पारंपरिक फेटे परिधान करून जयंतीला जो सन्मान दिला आहे, तो अत्यंत कौतुकास्पद आहे.”
यावेळी त्यांनी आणखी सांगितले की, “दादांनी जसे सांगितले, तसे आम्ही संपूर्ण विखे पाटील परिवार तुमच्या सर्वांच्या सोबत आहोत. तुमच्या गावातील कोणत्याही अडचणी, समस्या सोडवण्यासाठी विखे पाटील परिवार कटिबद्ध आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हा परिसर अधिक सक्षम व सुंदर करण्यासाठी प्रयत्नशील राहू. अण्णाभाऊ साठे यांची विचारसरणी सामाजिक न्याय आणि परिवर्तनासाठी आजही प्रेरणादायी आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण सामाजिक कार्यात सातत्य ठेऊ.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला अध्यक्ष जयाताई साळवे होत्या. कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन, अभिवादनपर भाषणे, विद्यार्थ्यांची वकृत्व स्पर्धा, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ग्रामस्थांनी, विशेषतः युवक व महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून या जयंती कार्यक्रमाला मोठे यश मिळवून दिले.
या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्या रोहिणीताई निघुते, प्रवरा बँकेचे संचालक अजय ब्राह्मणे,पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर विजयराव म्हसे, अशोकराव म्हसे, पत्रकार वैभव ताजणे, जिल्हाध्यक्ष विलासराव कदम, रणजीत गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य जानकीराम गायकवाड, भाजप पदाधिकारी अशोकराव जऱ्हाड, सामाजिक कार्यकर्ते मंजाबापू साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संघटना आश्वी बुद्रुक महिला विभाग यांच्यातर्फेही भरीव सहभाग नोंदवण्यात आला. महिला अध्यक्ष जयाताई साळवे, महिला उपाध्यक्ष अलका साळवे, मीनाताई प्रकाश भांड, सुनंदाताई कदम,भाऊसाहेब साळवे, लक्ष्मण साळवे, सागर कदम, देविदास शेलार, किरण साळवे, नवनाथ ताजणे,किरण गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य रामदास साळवे आदींसह असंख्य कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक सामाजिक संस्था आणि युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. गावकऱ्यांची एकजूट, तरुणाईचा जोश आणि महिलांचा सहभाग पाहता ही जयंती केवळ उत्सव न राहता, सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरली.
