पानोडी (प्रतिनिधी) :पर्यावरण संवर्धनासाठी झाडांच्या सावलीचा वारसा निर्माण करणारे सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त बालपण स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पानोडी येथील देवराई प्रकल्पाच्या वतीने विविध उपक्रमांद्वारे त्यांच्या कार्याला सलाम करत आगळावेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळच्या सत्रात वृक्षदिंडीने झाली. विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागृतीचे फलक, घोषणा व गीते घेऊन शाळा परिसरात दिंडी काढत वातावरणात हिरवळ निर्माण केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध स्थानिक झाडांच्या बियाणांचे संकलन करून शिंदे सरांना भेट दिली. शाळेच्या आवारात व देवराईत ६६ झाडांचे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालक वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग होता.
विशेष म्हणजे, काही विद्यार्थिनींनी टाकाऊ प्लास्टिक, कागद इत्यादींचा पुनर्वापर करत पर्यावरण पूरक राख्या तयार केल्या व त्यावर बियाण्यांचे सजावटीचे काम करून त्या सयाजी शिंदे सरांना भेटवस्तू म्हणून अर्पण करण्यात आल्या.
बालपण स्कूलमधील 5000 झाडांची देवराई ही सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झाली असून, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करत ही हिरवी शाळा घडवली आहे. आज या झाडांमधून फुले, फळे व सावली देणारे वृक्ष निर्माण झाले आहेत. ही संकल्पना मुलांच्या मनात रुजवण्याचे श्रेय शिंदे सरांनाच दिले जात आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या प्रमुख सौ. सोनाली मुंडे मॅडम, सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांनी सयाजी शिंदे सरांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आणि “आपल्या हस्ते अजून लाखो वृक्षांची सावली तयार व्हावी” अशी प्रार्थना व्यक्त केली.
ही एक आदर्श पर्यावरण चळवळ असून अशा अभिनव उपक्रमांतूनच समाजात हिरवळ निर्माण होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
