अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कै.रा.ब.पवार गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आश्वी बुद्रुक येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप


कै.रा.ब.पवार गुरुजी बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान, लोणी खुर्द यांच्या वतीने सामाजिक उपक्रम

आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) :
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कै. रा. ब. पवार गुरुजी बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान, लोणी खुर्द यांच्या वतीने आश्वी बुद्रुक येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप उपक्रम राबवण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व मुलींच्या शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक रामदास ढगे सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशीलकुमार पवार, सल्लागार प्रा.डॉ.भाऊसाहेब पवार, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय महाडिक, जिल्हाध्यक्ष विलास कदम, बाळासाहेब गावडे, मेजर बाळासाहेब पवार, तसेच पत्रकार सचिन उपाध्ये यांची उपस्थिती होती. यावेळी मुलींच्या शाळेचे प्राचार्य भाऊसाहेब गीते सर देखील उपस्थित होते.

या उपक्रमात मुला-मुलींना वह्या, पेन्सिली, रबर, शार्पनर, पेन आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विशेषतः मुलींच्या शाळेतील काही विद्यार्थिनींना साहित्य वाटप करून त्यांना शिक्षणात प्रोत्साहन देण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. डॉ.भाऊसाहेब पवार यांनी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत वंचित घटकांसाठी राबवलेले उपक्रम, अण्णाभाऊ साठे यांचे जीवनकार्य आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा यावर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व समजावले आणि त्यांच्या कुटुंबातील व्यसनाधीन व्यक्तींना सुधारण्यासाठी प्रेरणा देण्याचे आवाहन केले.

यावेळी चौथीच्या विद्यार्थ्यांना झाडे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. झाडांची जोपासना आणि त्यातून होणारे फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

मेजर बाळासाहेब पवार यांनी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय सैन्याविषयी आदर निर्माण व्हावा यासाठी स्वतःच्या सैनिकी अनुभवांचा आधार घेत मार्गदर्शन केले. “ऑपरेशन सिंदूर” या कारवाईचा अनुभव सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक व शैक्षणिक तयारीचे महत्त्व पटवून दिले.

दत्तात्रय महाडिक आणि विलास कदम या सामाजिक कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील प्रेरणादायी पैलू विद्यार्थ्यांपुढे मांडले. त्यांनी शिक्षणाचा प्रसार हा संस्थेचा प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट केले.

पत्रकार सचिन उपाध्ये यांनी सामाजिक क्षेत्रातील सकारात्मक उपक्रमांचे दस्ताऐवजीकरण आणि पत्रकारितेच्या सामाजिक जबाबदारीवर भाष्य करत नव्या पिढीला समाजकार्याची प्रेरणा दिली.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात शिक्षिका विजया लांडगे मॅडम, वर्षाताई कुऱ्हाडे मॅडम, अर्चना बर्वे मॅडम, संगीता क्षीरसागर मॅडम, रंजना शिंदे मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात, विद्यार्थ्यांच्या सहभागात आणि साहित्य वितरणात विशेष योगदान दिले.

कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली मुख्याध्यापक भाऊसाहेब गीते सर, मुलांची शाळा मुख्याध्यापक ढगे सर, तसेच सर्व मान्यवरांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. शाळेच्या वतीने प्रतिष्ठानचे आणि उपस्थित पाहुण्यांचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन शिक्षक हौशीराम मेचकर सरांनी केले. हा उपक्रम अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना कृतीत उतरवणारा आणि समाजासमोरील जबाबदारीची जाणीव करून देणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला, असे प्रतिपादन शाळेच्या मुख्याध्यापकांनी शेवटी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!