महाराजा यशवंतराव होळकर पब्लिक स्कूल मांची हिल मध्ये लहान बालकांकडून बैलपोळा उत्सव उत्साहात साजरा!

संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

महाराजा यशवंतराव होळकर पब्लिक स्कूल मांची हिल मध्ये पारंपरिक रितीरिवाज जपत बैलपोळा हा सण लहान बालकांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी सुंदर रांगोळ्या काढल्या, बैलांची प्रतिकृती सजवली तसेच बैलपोळा सणाचे महत्त्व सांगणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

या कार्यक्रमासाठी शाळेचे आदरणीय प्राचार्य, सर्व शिक्षक-शिक्षिका, कर्मचारी व शाळेचे संस्थापक उपस्थित होते. त्यांनी मुलांना सणाचे सामाजिक, सांस्कृतिक आणि कृषी महत्त्व समजावून सांगितले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात बैलाचे स्थान किती महत्वाचे आहे हे मुलांना पटवून देत हा सण केवळ धार्मिक परंपरेपुरता मर्यादित नसून शेतकऱ्यांच्या कष्टाला दिलेला सन्मान आहे, असे प्रतिपादन प्राचार्यांनी केले.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बैल, निसर्ग व शेतकरी यांच्यातील नात्याची जाणीव करून दिली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक वारसा जपण्याची भावना, शेतकऱ्यांविषयी आदर तसेच ग्रामीण जीवनाशी नाळ जोडण्याचे महत्त्व अधोरेखित झाले.

शाळेच्या संस्थापकांनी व कर्मचारी वर्गाने विद्यार्थ्यांचे कौतुक करून भविष्यात अशाच उपक्रमांद्वारे भारतीय संस्कृतीची मोलाची परंपरा जपली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रमात बालकांनी पारंपरिक पोशाख घालून सहभाग घेतल्याने वातावरण अधिकच रंगतदार झाले. उत्साह, आनंद आणि संस्कार यांचा सुंदर संगम घडवून हा सण शाळेत यशस्वीपणे पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!