शिर्डी – निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने साईबाबांच्या पुण्यनगरी शिर्डीत “महाराष्ट्राच्या तेजस्वी कर्तृत्वाचा सन्मान” सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात समाजकार्यात उल्लेखनीय योगदान दिलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला खासदार भाऊसाहेब वाकचौरे, सुप्रसिद्ध अभिनेते विजय पटवर्धन आणि उद्योजिका मोनिका फर्नांडिस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात शिर्डीच्या ज्येष्ठ उद्योजिका आणि समाजसेविका साबेरा करीम सय्यद यांना भारत समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
साबेरा सय्यद यांनी महिलांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी विशेष कार्य केले आहे. त्या महिलांना नेहमी प्रेरणा देतात की स्त्रीचे जीवन फक्त “चूल आणि मूल” इतक्यापुरते मर्यादित न राहता तिने शिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे. त्यांनी स्वतः या विचारांचे पालन करून प्रथम आपल्या मुलीला उच्च शिक्षण (एमएमएस, एमएसडब्ल्यू, एमबीए, पीएचडी, एलएलबी, एलएलएम) मिळवून दिले आणि तिच्या स्वावलंबनाचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर समाजातील इतर महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले.
“झाशीची राणी महिला सामाजिक प्रतिष्ठान” या संस्थेच्या माध्यमातून त्या महिलांना कौटुंबिक, सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचे धडे देत असतात. मुस्लिम समाजातील असूनही त्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व आणि प्रेम आहे. त्यामुळे विविध समाजघटकांतील महिलांपर्यंत त्यांचा संवाद अधिक प्रभावी ठरतो.
साबेरा सय्यद यांच्या कार्याची पावती म्हणूनच त्यांना “भारत समाज भूषण पुरस्कार” मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले. या गौरवामुळे समाजातील सर्वसामान्य महिला व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
