लोणी : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील दोन महान व्यक्तिमत्त्वे — सहकार चळवळीचे जनक पद्मभूषण डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते, माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील — यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण सोहळा आज लोणी येथे अत्यंत भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

‘पद्मस्मृती’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या स्मारकाचे अनावरण देशाचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या ऐतिहासिक सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील आणि राजेंद्रजी विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अमित शाह यांचा गौरवोद्गार: कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले,
“डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी महाराष्ट्रात सहकाराची बीजे रुजवून शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवली. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य आणि उद्योग क्षेत्रात विकासाचा नवा अध्याय लिहिला. त्यांच्या कार्यामुळेच आज सहकार क्षेत्र हे महाराष्ट्राचे बळ ठरले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
“डॉ. विखे पाटील पिता-पुत्र हे महाराष्ट्राच्या सहकार आणि विकास चळवळीचे दीपस्तंभ आहेत. ‘पद्मस्मृती’ हे स्मारक म्हणजे त्यांच्याप्रती असलेले आपले आदराचे प्रतीक आहे. या ठिकाणी येणारा प्रत्येक नागरिक प्रेरणादायी कार्याचा साक्षीदार होईल.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची उपस्थिती
या प्रसंगी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल विखे पाटील परिवाराचे कौतुक केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,
“सहकार म्हणजे समाजाची उभी रेषा आणि विखे पाटील यांनी ती प्रत्यक्षात उतरवली.”
तर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,
“या स्मारकामुळे पुढील पिढीला प्रेरणा मिळेल.”

‘पद्मस्मृती’ — एक गौरवशाली स्मारक
‘पद्मस्मृती’ या स्मारकात विखे पाटील पिता-पुत्रांच्या कार्याचा आढावा घेणारे फलक, सहकाराच्या इतिहासाचे दर्शन घडवणारी छायाचित्रे आणि आधुनिक डिझाईन असलेले सभागृह समाविष्ट आहे. या स्मारकामुळे लोणी हे ठिकाण महाराष्ट्राच्या सहकार चळवळीतील एक प्रेरणास्थळ ठरणार आहे.
