संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावात घडलेल्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गावातील पीरबाबा नगर परिसरातील मांग गारुडी समाजातील दोन नागरिकांच्या मोटरसायकलींना एका अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे हा प्रकार आश्वी बुद्रुक पोलिस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
बाजारतळाशेजारी मांग गारुडी समाजाची वस्ती असून, त्या ठिकाणी असलेल्या पीरबाबा मंदिराच्या आवारात पार्वती ज्ञानदेव लोंढे यांची बजाज कंपनीची प्लॅटिना (एमएच १७ डीजी ६९६७) आणि भारत लोंढे यांची पॅशन प्रो- हौंडा (एमएच १७ एक्स ८५६८) या दोन मोटरसायकली उभ्या होत्या. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्या दोन्ही गाड्यांना पेटवून दिले. आग इतक्या वेगाने पसरली की काही क्षणांतच दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या. रात्रीची वेळ असल्याने हा प्रकार उशीरा लक्षात आला, तोपर्यंत दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

या दुर्दैवी घटनेत दोन्ही वाहनधारकांचे एकूण अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस पथकाने घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून तपास सुरू आहे. मात्र, ही घटना पोलिस ठाण्याच्या जवळ आणि वस्तीमध्ये घडल्याने सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त होत आहे.
नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली असून, अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “जर पोलिस ठाण्याच्या अगदी जवळ अशी घटना घडत असेल, तर गावातील सामान्य नागरिक किती सुरक्षित?” असा थेट सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

या घटनेमुळे रात्री रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनधारकांमध्ये आणि घराबाहेर वाहन ठेवणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांनी या प्रकारानंतर सुरक्षा वाढवावी, सीसीटीव्ही बसवावेत आणि रात्रीच्या गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केला असून, लवकरच आरोपीला गजाआड करण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेवरील प्रश्न अधोरेखित केला आहे.
