शिव महापुराण कथेस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
अस्तगाव (ता. राहाता) : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

अहिल्यानगर जिल्ह्यातील अस्तगाव येथे पंडित प्रदीप मिश्रा महाराज (सीहोर वाले) यांच्या शिव महापुराण कथा सोहळ्याचा आज भक्तीमय वातावरणात शुभारंभ झाला. या पवित्र सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी भाविकांचा प्रचंड जनसागर उपस्थित राहिला होता. परिसरात “हर हर महादेव” आणि “ॐ नमः शिवाय” या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.

या भव्य आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले असून, या संपूर्ण सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन मा.ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील आणि मा.खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
सकाळी पूज्य पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या मंगल वाणीने कथा सोहळ्याचा प्रारंभ झाला. “श्री शिवाय नमस्तुभ्यं” च्या गजरात हजारो भाविकांनी सहभाग नोंदवला. पंडितजींच्या ओजस्वी प्रवचनातून भगवान शिवाच्या महिम्याचे विवेचन करण्यात आले. त्यांच्या गोड आणि प्रभावी वाणीने भाविक मंत्रमुग्ध झाले.

या शिवमहापुराण कथेमुळे संपूर्ण परिसरात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचे वातावरण निर्माण झाले आहे. उपस्थित भक्तांनी पंडितजींचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले. अनेकांनी या दिव्य सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी दूरदूरच्या भागांतून आगमन केले.
या कार्यक्रमाचे सर्व व्यवस्थापन जनसेवा फाऊंडेशनने अत्यंत सुयोग्यरित्या पार पाडले. भाविकांसाठी वाहतूक, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा आणि प्रसाद वितरणाची उत्कृष्ट सोय करण्यात आली होती. कार्यक्रमस्थळी पोलिस आणि स्वयंसेवकांकडून प्रभावी शिस्त राखण्यात आली.

पहिल्याच दिवशी झालेल्या या शिवमहापुराण कथेला अहिल्यानगर जिल्हा तसेच शेजारच्या जिल्ह्यांतील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. ही कथा संपूर्ण आठ दिवस चालणार असून, दररोज सकाळी पंडित प्रदीप मिश्रा महाराज भगवान शिवाचे विविध प्रसंग सविस्तर कथन करणार आहेत.

अस्तगाव येथे सध्या भक्तीचा उत्सव सुरू असून, सर्वत्र “हर हर महादेव” आणि “श्री शिवाय नमस्तुभ्यं” चे जयघोष घुमत आहेत. या पवित्र सोहळ्यामुळे समाजात श्रद्धा, एकात्मता आणि संस्कार यांचा दिव्य संदेश पसरत आहे.
ठिकाण : पिंपरी निर्मळ, अस्तगाव, ता. राहाता, जि.
अहिल्यानगर.
