शिव महापुराण कथेच्या दुसऱ्या दिवशीही भाविकांचा जनसागर!

अस्तगाव (राहाता) : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

जनसेवा फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या पूज्य पंडित प्रदीपकुमार मिश्रा महाराज यांच्या महा शिवमहापुराण कथेच्या दुसऱ्या दिवशीही अस्तगाव येथे भाविकांचा प्रचंड जनसागर उसळला. जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी महाराजांच्या सुश्राव्य वाणीतून भगवान शिवशंकराच्या महिमेचा दिव्य अनुभव घेतला.

कार्तिक महिन्याच्या पावन पर्वावर सुरू असलेल्या या अध्यात्मिक सोहळ्याला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भगवान शंकराच्या कीर्तनरूपी कथेतील अध्यात्म, ज्ञान आणि संस्कार यांचा सुंदर संगम भाविकांना आत्मिक समाधान देत आहे.

या भव्य अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन जनसेवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले असून, या संपूर्ण सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन मा.ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील आणि मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. अध्यात्म आणि संस्कृतीचा संदेश जनमानसात पोहोचविण्याचे हे कार्य स्तुत्य असल्याचे मत भाविकांनी व्यक्त केले. पूज्य पंडित प्रदीपकुमार मिश्रा महाराज यांच्या अमोघ, मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीतून सादर होणारी शिवकथा आत्म्याला स्पर्श करणारा अनुभव देत आहे. “शिवकथा म्हणजे आत्म्याला स्पर्श करणारा अध्यात्मिक प्रवास आहे,” असे मत अनेक शिवभक्तांनी व्यक्त केले.

अस्तगाव परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या महाशिवपुराण कथेने वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले आहे. दिवसभर “हर हर महादेव”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता.या अध्यात्मिक पर्वात मोठ्या प्रमाणावर भाविकांनी दर्शन, कीर्तन आणि कथा श्रवणाचा लाभ घेतला. पुढील काही दिवसांपर्यंत ही कथा सुरू राहणार असून, दररोज वाढत्या संख्येने भक्त सहभागी होण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!