अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा! महायुती सरकारचा ८४६ कोटींचा ‘सुवर्णनिर्णय’

अहिल्यानगर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

जिल्ह्यात सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी तब्बल ८४६ कोटी ९६ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी थेट आर्थिक मदत जमा होणार आहे.

महायुती सरकारच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठा दिलासा मिळणार आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीनंतर शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. मात्र सरकारने तात्काळ परिस्थितीचा आढावा घेऊन भरपाईचा निर्णय घेतला असून ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

जलसंपदा विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून ही मदत जाहीर करण्यात आली असून या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सणासुदीपूर्वी मोठा दिलासा मिळेल.

या मदतीमुळे जिल्हाभरात शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून महायुती सरकारचा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वीचा ‘सुवर्णउपहार’ ठरत आहे. शेतकरी वर्गाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!