प्रवरा नदीवरील पुल आणि रस्त्यांची दयनीय अवस्था; ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ सुरूच!

आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

परिसरातील प्रवरा नदीवरील पूल सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून, पुलावर खोलखोल खड्डे पडल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. आश्वी बुद्रुक आणि आश्वी खुर्द या दोन गावांना जोडणारा हा पूल गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित आहे. पुलाच्या दुरुस्तीचे कोणतेही काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, दररोज या पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पुलावरील डांबराचा थर पूर्णपणे उखडल्याने ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. अवकाळी पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनं घसरतात आणि अनेकदा लहान-मोठे अपघात घडत आहेत. पुलावर प्रकाशयोजनेचा अभाव असल्याने रात्रीच्या वेळी हा प्रवास आणखी धोकादायक ठरतो.

नागरिकांच्या मते पुलावर कोणतेही चेतावणी फलक नाहीत, तसेच प्रशासनाने पाहणीसुद्धा केलेली नाही. प्रवरा नदीवरील हा पूल हा दोन्ही गावांना जोडणारा प्रमुख मार्ग असून, या मार्गाने दररोज आश्वी पंचक्रोशीतील विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि कामगार यांचा मोठ्या प्रमाणावर प्रवास असतो. त्यामुळे अपघाताची शक्यता कायम असल्याने सर्वसामान्य नागरिक भीतीच्या छायेत जगत आहेत.

या पुलाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, वाहनांचे नुकसान तसेच जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीसुद्धा प्रशासनाकडून कोणतीही हालचाल दिसून येत नाही. नागरिकांनी तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली असून, पुलाची दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा भाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास गायकवाड यांनी दिला आहे. “एखादा गंभीर अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.

पुलाच्या दोन्ही बाजूंना चेतावणी फलक, सिग्नल व्यवस्था आणि तात्पुरती दुरुस्ती करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. ग्रामस्थांच्या मते, रस्ते आणि पूल हे विकासाचे प्रतीक असतात. परंतु प्रवरा नदीवरील पुलाची अवस्था पाहता ही घोषणाच केवळ कागदावरच असल्याचे स्पष्ट होते. स्थानिक प्रशासनाने तातडीने या पुलाची पाहणी करून आवश्यक निधी मंजूर करून दुरुस्तीचे काम सुरू करावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. अन्यथा नागरिक आक्रमक भूमिका घेतील, असा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!