“थोरात यांच्या दंडकारण्य संकल्पनेचा विजय — तालुका झाला वनराईचा आदर्श!”

संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानामुळे संगमनेर तालुक्यातील उघडे बोडके डोंगर हिरवेगार दिसू लागले असून तालुक्यात झाडे वाढली आहेत. त्यामुळे तालुका हिरवागार दिसत आहेत. अमृतवाहिनीचे थोरात कृषी महाविद्यालय अत्यंत अत्याधुनिक सुविधांसह सज्ज होत असून चांगल्या गुणवत्तेमुळे अमृतवाहिनी हा देशात शिक्षणाचा ब्रँड ठरला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे मा.शिक्षण व महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

सायखिंडी येथे जयहिंद लोकचळवळ, अमृत उद्योग समूह व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दंडकारण्य अभियानाच्या 20 व्या आनंद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी मा.आ.डॉ.सुधीर तांबे हे होते. तर व्यासपीठावर ॲड.माधवराव कानवडे, सौ.कांचनताई थोरात, सौ.दुर्गाताई तांबे, लहानु भाऊ पाटील गुंजाळ, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, डॉ.हसमुख जैन, सौ.शरयूताई देशमुख, डॉ.जयश्रीताई थोरात, रामहरी कातोरे, विष्णुपंत रहाटळ, राजेंद्र चकोर,विलास वरपे, राजेंद्र कडलग,आनंद वर्पे,भारत वरपे, विलास कवडे, रावसाहेब दुबे,शांताराम कढणे,प्रा.बाबा खरात, सरपंच नवनाथ शिंदे,मोहनराव करंजकर, दीपक करंजकर, मारुती गांडोळे,प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघ,मुख्याध्यापक दशरथ वर्पे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, प्रा.जी.बी.बाचकर आदी उपस्थित होते.

आनंद मेळाव्यानिमित्त कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाच एकर परिसरामध्ये 400 आंबा व 170 चिकू वृक्षाचे रोपण केले. तर गायक विनोद राऊत व 200 विद्यार्थ्यांनी विविध पर्यावरण संवर्धनाची गीते एका वेळी गायली.

याप्रसंगी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, दंडकारण्य अभियानामुळे तालुक्यात वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली आहे. पिंपळगाव कोझीरा, हरमन हिल, मोरया डोंगर,देवगड, खांडगाव,ईटीपी डोंगर या परिसरामध्ये झालेल्या वृक्षरोपणामुळे हे डोंगर उन्हाळ्यामध्ये सहलीसारखे ठिकाणी झाले आहेत. वृक्षांमुळे पाऊस चांगला पडत असून वृक्षांची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

कृषी महाविद्यालयाच्या वतीने अत्याधुनिक इमारतीसह शेतीमधील नवीन प्रयोग या परिसरामध्ये सुरू करण्यात आले आहे. ही नवी वाटचाल आहे. महाविद्यालयामध्ये अद्यावत फुटबॉल व क्रिकेटचे ग्राउंड होणार आहे. जानेवारीमध्ये 9 ते 13 जानेवारी या काळात कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य कृषी प्रदर्शन होणार आहे. मागील तीन वर्षात कृषी महाविद्यालयासाठी चांगले काम झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी जागेसाठी मदत केली त्या सर्वांचे आभार मानताना या महाविद्यालयाचा परिसर हा विद्यापीठासारखा होईल. गुणवत्ता ही वैशिष्ट्य अमृतवाहिनी संस्थेने जपले असून तो शिक्षणाचा ब्रँड ठरला असल्याचे ते म्हणाले.

तर मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मधील सर्व सहकारी व शिक्षण संस्था या राज्यात अग्रगण्य आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेले दंडकारण्य अभियान सह्याद्री सातपुडा पर्वतापर्यंत पोहोचले असून सप्तशृंगी डोंगरावर 55 एकर परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे. वृक्ष संवर्धन व वनराई निर्माण करणे ही खरी मानव व ईश्वर सेवा असल्याचे त्यांनी म्हटले असून तालुक्यातील 31 डोंगरांवर वृक्षारोपण व संवर्धन करण्यात आले आहे असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर मोहनराव करंजकर यांनी आभार मानले. याप्रसंगी बादशहा वर्पे, सूर्यभान वर्पे, दत्तू वर्पे,गोपीनाथ गुळवे यांच्यासह चिकणी, सायखिंडी व परिसरातील नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वाजत गाजत वृक्षदिंडी काढून मान्यवरांचे स्वागत केले.

कृषी महाविद्यालयाच्या वतीने रेशीम उद्योग व ट्यूलिप गार्डन

पहिल्याच वर्षी थोरात कृषी महाविद्यालयामध्ये पहिल्या फेरीत ऍडमिशन फुल झाले. तीनही वर्ष अत्यंत गुणवत्तेचे विद्यार्थी महाविद्यालयात आले असून हे महाविद्यालय अत्यंत गुणवत्तेचे ठरावे यासाठी काम होत आहे. कृषी महाविद्यालयाच्या वतीने रेशीम उद्योग सुरू करण्यात येत असून तालुक्यांमध्ये 200 शेतकऱ्यांनी तुती लागवड केली आहे. यामधून शेतीपूरक कृषी रेशीम उद्योग सुरू होणार आहे. तर काश्मीरच्या धरतीवर कृषी महाविद्यालयाच्या आवारामध्ये ट्युलिप गार्डन उभारण्यात येणार असल्याचे मा.कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!