मालेगाव : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
डोंगराळे येथे चिमुकली कु. यज्ञा दुसाने हिच्यावर झालेले अमानवी अत्याचार आणि निर्घृण हत्येने संतप्त झालेल्या संपूर्ण मालेगाव शहर व तालुक्याने आज जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून ऐतिहासिक आणि अभूतपूर्व एकजूट प्रकट केली. शहर आणि तालुक्याच्या वतीने पाळण्यात आलेल्या मालेगाव बंदमध्ये सर्व समाजघटकांनी स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवत आरोपीला तातडीने फाशीची मागणी करत तीव्र संताप व्यक्त केला.

या मोर्चात राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे स्वतः उपस्थित राहून यज्ञासाठी न्याय मिळावा यासाठी ठाम भूमिका मांडली. सकाळी रामसेतू पूल येथून मोर्चा सुरू झाला आणि ‘यज्ञाला न्याय मिळालाच पाहिजे’ या निर्धाराने हजारो नागरिकांनी पायी मार्गक्रमण करत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. या विशाल रॅलीत सामाजिक व धार्मिक संघटना, वकील संघ, महिला वर्ग, युवक–युवती, तसेच लहान मुलांचा मोठ्या प्रमाणातील सहभाग पाहायला मिळाला—ज्यामुळे संपूर्ण तालुका एका स्वरात उभा असल्याचे स्पष्ट झाले.

मोर्चादरम्यान मंत्र्यांनी सांगितले,
“डोंगराळे येथील ही घटना फक्त एका कुटुंबाची नाही, तर संपूर्ण समाजमनावर अमानुष जखम करणारी आहे. या बालिकेवरील अत्याचाराचे वर्णन करण्यास शब्दही अपुरे पडतील. आज मालेगाव तालुका न्यायाच्या लढ्यासाठी एकदिलाने उभा आहे.”

यानंतर त्यांनी सांगितले की,“बालिकेच्या कुटुंबियांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन फास्ट ट्रॅक कोर्ट, वरिष्ठ सरकारी वकील आणि तातडीच्या न्यायाची मागणी केली असून मुख्यमंत्री महोदयांनीही ही मागणी तत्काळ मान्य केली आहे. आरोपीला शक्य तितक्या लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.”

मोर्चादरम्यान मंत्री भुसे यांनी डीवायएसपी बाविस्कर यांच्या चुकीच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला.“पोलीस कोठडीऐवजी मॅजिस्ट्रेट कस्टडीची मागणी करणे हा आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होता. माझ्या हस्तक्षेपानंतर अहवाल बदलण्यात आला आणि कोर्टाने ८ दिवसांची पोलीस कोठडी दिली. या अधिकाऱ्यांच्या बदली व निलंबनाची मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे सादर केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मोर्चाच्या अखेरीस लहान मुलींच्या हस्ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आणि यज्ञाला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मालेगावच्या इतिहासातील हा मोर्चा जनतेच्या न्यायासाठीच्या एकजुटीचा जिवंत संदेश ठरला.
