संघर्ष, अत्याचार, तुरुंगवास यांवर मात करत “जवान चंदू चव्हाण शौर्य अकॅडमी” तून लाखो तरुणांना देशसेवेसाठी घडवण्याचा संकल्प!
निर्भीड जनता न्यूज नेटवर्क :
देशसेवेची वर्दी अंगावर नसली, तरी मनातला सैनिक कधीच मरत नाही, हे जवान चंदू चव्हाण यांनी आपल्या जीवनातून पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. पाकिस्तानच्या कैदेत तीन महिने २१ दिवस अमानुष अत्याचार, नाशिक आणि मुंबईतील आर्थर रोड कारागृहात चार महिने दहा दिवसांचा तुरुंगवास, तब्बल अकरा वर्षांची देशसेवा आणि अखेरीस नोकरी गमावण्याची वेदना… या साऱ्या संघर्षातून उभा राहिलेला हा जवान आज पुन्हा एकदा देशासाठी लढतो आहे – पण बंदुकीने नव्हे, तर तरुणांच्या घडणीतून.
जवान चंदू चव्हाण यांचे आयुष्य हे धैर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचे जिवंत उदाहरण आहे. देशासाठी काम करत असताना त्यांनी अनेक कठीण परिस्थितींना सामोरे गेले. पाकिस्तानच्या कैदेत असताना सहन करावे लागलेले शारीरिक आणि मानसिक अत्याचार आजही अंगावर काटा आणणारे आहेत. त्यानंतर देशात परतल्यानंतरही तुरुंगवास आणि प्रशासनाशी झालेला संघर्ष त्यांच्या वाट्याला आला. अखेरीस वर्दी हिरावली गेली, पण देशभक्तीचा आत्मा अजूनही ताठ मानेने ‘जय हिंद’ म्हणत उभा आहे.
आज परिस्थिती अशी आहे की त्यांच्या जवळ ना राहण्याची कायमची जागा आहे, ना खाण्यापिण्याची निश्चित सोय. मात्र महाराष्ट्रभरातून त्यांच्या संपर्कात येणाऱ्या शेकडो-हजारो तरुणांचा विश्वास आणि हाक हेच त्यांचे खरे बळ बनले आहे. “सर, आम्हाला देशासाठी तयार करा,” हा आवाजच त्यांच्या नव्या मिशनची सुरुवात ठरला.
याच उद्देशाने त्यांनी ‘जवान चंदू चव्हाण शौर्य अकॅडमी’ आणि ‘मिशन वर्दी’ उपक्रमाच्या माध्यमातून एक वेगळीच चळवळ उभी करण्याचा संकल्प केला आहे. ही केवळ प्रशिक्षण देणारी अकॅडमी नसून, घराघरात सैनिकवृत्ती निर्माण करण्याची क्रांती आहे. युद्धजन्य परिस्थितीत देशाचं रक्षण करू शकतील, स्वतः आत्मनिर्भर बनतील आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण स्वतःच्या बळावर करू शकतील, असे सक्षम तरुण घडवणं हेच या अकॅडमीचं मुख्य उद्दिष्ट आहे.
“एक वर्दी माझ्याकडून गेली, पण माझ्या हातून लाखो वर्दीधारी भारतरक्षक तयार होतील,” हा विश्वास घेऊन जवान चंदू चव्हाण आज पुन्हा मैदानात उतरले आहेत. हा लढा केवळ त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी नसून, देशासाठी काहीतरी करायची जिद्द ठेवणाऱ्या प्रत्येक भारतीयासाठी आहे.
अकरा वर्ष देशाची सेवा करूनही आज विना पेन्शन, विना नोकरी आणि असह्य आर्थिक संकटात जीवन जगणारे जवान चंदू चव्हाण हे नाव सध्या राज्यभर चर्चेत आहे. देशसेवेसाठी आयुष्याचा महत्त्वाचा काळ अर्पण केलेल्या या जवानावर झालेल्या कथित अन्यायाविरुद्ध ते आता निर्भीडपणे आवाज उठवत असून, तरीही सैन्याविषयीचा आदर आणि देशभक्ती मात्र तसूभरही कमी झालेली नाही.
निर्भीड जनता न्यूजशी बोलताना जवान चंदू चव्हाण यांनी आपल्या आयुष्यातील संघर्षमय प्रवास उलगडला. “अकरा वर्ष देशसेवा केल्यानंतरही मला पेन्शन मिळाली नाही. आज कुठेही नोकरी करता येत नाही. तुरुंगवासात असताना माझ्यावर तब्बल बारा लाख रुपयांचे कर्ज होते. अडीच महिने कारागृहात राहिल्यानंतर प्रथमच मी माझ्या नवजात मुलाचा चेहरा पाहिला,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या वेदना व्यक्त केल्या.
चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवेत असताना काही गंभीर मुद्द्यांवर त्यांनी यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून आपली बाजू मांडली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना कारागृहात टाकण्यात आले. नाशिक व मुंबईतील आर्थर रोड कारागृहात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. याआधी पाकिस्तानच्या कैदेतही ते तीन महिने २१ दिवस अमानुष अत्याचार सहन करून देशात परतले होते.
“हा लढा माझा सैन्याविरुद्ध नाही,” हे ते ठामपणे सांगतात. “माझा लढा हा अन्यायाविरुद्ध, व्यवस्थेविरुद्ध आहे. आजही ब्रिटिश काळातील १९५० च्या कायद्यानुसार (आर्मी अॅक्ट) शोषण होत असल्याची भावना आहे. त्याविरुद्ध माझा आवाज आहे. सैन्यावर, सैन्याच्या शौर्यावर माझा अटळ विश्वास आहे. मी मरेपर्यंत सैन्याचा आदरच करणार,” असे ते स्पष्ट करतात.
विशेष म्हणजे, चव्हाण यांचा संपूर्ण परिवारही देशसेवेशी जोडलेला आहे. “माझा भाऊ आजही सैन्यात आहे. माझ्या दोन्ही मुलांनाही भविष्यात सैन्यातच भरती करण्याचा माझा निर्धार आहे,” असे ते सांगतात. तुरुंगातून सुटल्यावरही त्यांनी हार मानलेली नाही. उलट, देशासाठी काहीतरी करायचाच, हा निर्धार अधिक दृढ झाला आहे.
याच उद्देशाने त्यांनी ‘शौर्य अकॅडमी’ आणि ‘मिशन वर्दी’ या उपक्रमाची संकल्पना पुढे आणली आहे. युद्धजन्य परिस्थितीत देशरक्षणासाठी सक्षम तरुण घडवणे, त्यांना शिस्त, आत्मनिर्भरता आणि राष्ट्रनिष्ठा शिकवणे, हाच या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
“एक वर्दी माझ्याकडून गेली, म्हणून मी थांबणार नाही. उलट लाखो वर्दीधारी तरुण देशाला अर्पण करणार, हा माझा संकल्प आहे. उद्या देशावर संकट आले, तर मी युवकांना प्रशिक्षण देऊन देशासाठी उभं करेन,” असा ठाम विश्वास चंदू चव्हाण यांनी व्यक्त केला.
आज विना पेन्शन, आर्थिक अडचणी आणि अनेक अडथळ्यांमध्येही जवान चंदू चव्हाण यांचा संघर्ष सुरूच आहे. मात्र, अन्यायाविरुद्ध लढताना आणि तरीही सैन्याचा सन्मान जपत देशभक्त तरुण घडवण्याचा त्यांचा हा प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
अकरा वर्षांची देशसेवा केल्यानंतर आज आर्थिक संकट, कर्जाच्या नोटिसा आणि वैयक्तिक अडचणींशी सामना करत असतानाही देशासाठी काहीतरी करण्याचा ध्यास कायम ठेवणारे जवान चंदू चव्हाण हे सध्या धुळ्यातील युवकांसाठी आशेचा किरण बनले आहेत. वर्दी जरी अंगावर नसली तरी देशभक्तीचा विचार आणि सैनिक घडवण्याचा संकल्प त्यांनी सोडलेला नाही.
सध्या जवान चंदू चव्हाण यांच्यावर तब्बल १२ लाख रुपयांचे कर्ज असून ते कर्ज फेडण्यासाठी त्यांना नोटिसाही प्राप्त झाल्या आहेत. अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी माघार न घेता, “एक वर्दी गेली म्हणून लाखो वर्दी देशाला देणार” या ध्येयाने धुळे येथे सकाळी जोपर्यंत प्रशिक्षणार्थींची सोय होत नाही तोपर्यंत मोफत प्रशिक्षण शिबिर सुरू केले आहे. या प्रशिक्षणामध्ये देशसेवा, शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती आणि युद्धजन्य परिस्थितीत उपयोगी येतील अशा बाबींवर भर दिला जात आहे.
या उपक्रमाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून, हजारो युवकांचे फोन रोज जवान चंदू चव्हाण यांना येत आहेत. मात्र, प्रशिक्षणासाठी येणाऱ्या युवकांना राहण्याची व जेवणाची सोय उपलब्ध नसल्याने ते हतबल झाले आहेत. इच्छुक युवकांची संख्या मोठी असली तरी आवश्यक पायाभूत सुविधांच्या अभावामुळे सर्वांना सामावून घेणे सध्या शक्य होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
याच पार्श्वभूमीवर जवान चंदू चव्हाण यांनी ‘जवान चंदू चव्हाण शौर्य अकॅडमी’ साठी जागा उपलब्ध करून देणे, तसेच प्रशिक्षणार्थी युवकांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था करण्यासाठी समाजातील सर्व घटकांकडे मदतीचे आवाहन केले आहे. त्यांनी स्थानिक नागरिक, समाजसेवी संस्था, उद्योजक, तसेच राजकीय नेते, पदाधिकारी आणि मंत्रीगण यांच्याकडेही या राष्ट्रकार्याला पाठबळ देण्याची विनंती केली आहे.
“ही मदत माझ्यासाठी नाही, तर देशासाठी सैनिक घडवण्यासाठी आहे. उद्या देशावर संकट आले तर हेच प्रशिक्षित युवक देशरक्षणासाठी उभे राहतील,” असा विश्वास जवान चंदू चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. आर्थिक अडचणी, कर्जाचे ओझे आणि मर्यादित साधनसामग्री असूनही त्यांनी सुरू ठेवलेला हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
आज देशभरात राष्ट्रसेवेसाठी उत्सुक असलेले असंख्य युवक मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा वेळी जवान चंदू चव्हाण यांच्या “जवान चंदू चव्हाण शौर्य अकॅडमी” सारख्या उपक्रमाला समाजाकडून आणि प्रशासनाकडून सहकार्य मिळाल्यास अनेक तरुणांच्या आयुष्याला दिशा मिळू शकते, तसेच देशासाठी सक्षम जवानांची नवी पिढी घडू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आज चंदू चव्हाण हे नाव केवळ एका माजी जवानापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते प्रेरणेचं प्रतीक बनत चाललं आहे. संघर्षातून उभा राहून राष्ट्रनिर्मितीसाठी काम करण्याची त्यांची ही वाटचाल अनेक तरुणांसाठी नवा आदर्श निर्माण करणारी ठरत आहे. देशासाठी जीव द्यायला तयार असलेल्या, पण हार मानायला तयार नसलेल्या प्रत्येक तरुणासाठी ही कहाणी निश्चितच प्रेरणादायी आहे.
