नववर्षात ‘एक झाड – एक संकल्प’ : बालपण स्कूल पानोडीचा पर्यावरणासाठी प्रेरणादायी उपक्रम

निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

पानोडी : नववर्षाच्या स्वागताला सामाजिक आणि पर्यावरणीय जाणिवेची जोड देत बालपण स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पानोडीच्या विद्यार्थ्यांनी परिसरात एक प्रेरणादायी उपक्रम राबवला. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी नववर्षाचे स्वागत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने केले.

आश्वी, आश्वी बुद्रूक, उंबरी, शिबलापूर, पिंप्री, वरवंडी, कौठे, दाढ बुद्रूक, दाढ खुर्द, चिंचपूर, ओझर, कनकापूर आदी गावांतील व्यावसायिकांना विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भेट देत नववर्षाच्या शुभेच्छा कार्डांचे वितरण केले. या शुभेच्छा कार्डांमधून “या वर्षात किमान एक झाड आपल्या घरासमोर, दुकानासमोर किंवा शेतात लावा” असे भावनिक आणि जबाबदारीची जाणीव करून देणारे आवाहन करण्यात आले.

गेल्या १२ वर्षांपासून पर्यावरण रक्षणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या बालपण स्कूलने विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच निसर्गप्रेम रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. शाळेतील विविध उपक्रम पर्यावरणाशी जोडून समाजापर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जातो. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिक व पालकांमध्येही पर्यावरणाबाबत सकारात्मक जागृती होत आहे.या अभिनव उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी मनापासून कौतुक केले.

“लहान मुले जर आपल्याला झाडे लावण्याचे आवाहन करत असतील, तर आपण मागे राहणे योग्य नाही” अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.‘शुभेच्छा कार्डातून पर्यावरणाचा संदेश आणि किमान एक झाड लावण्याचा संकल्प’ हा नववर्षाच्या स्वागताचा अभिनव आणि अनुकरणीय उपक्रम ठरला आहे. बालपण स्कूलच्या सर्व विद्यार्थी व शिक्षकवर्गाच्या विशेष नियोजनातून, तसेच संस्थेच्या प्रमुख सौ. सोनाली मुंढे यांच्या संकल्पनेतून हा पर्यावरण रक्षणाचा निर्धार नववर्षाच्या स्वागताद्वारे प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यात आला.

हा उपक्रम केवळ नववर्ष साजरे करण्यापुरता मर्यादित न राहता, भावी पिढीसाठी हिरवे भविष्य घडवण्याचा संदेश देणारा ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!