महामानवांचा अपमान आणि सार्वजनिक स्वच्छतेची थट्टा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह महापुरुषांचे फोटो अडगळीच्या खोलीत धुळखात असे का?
गावाची घंटागाडीही त्याच खोलीत बंद — सामाजिक संघटना आक्रमक!
शिबलापूर : निर्भीड जनता न्यूज
संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायत शिबलापूर येथे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आणि असंवेदनशीलतेचा कळस गाठल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच इतर थोर महामानवांचे फोटो ग्रामपंचायत कार्यालयातील बंदिस्त अडगळीच्या खोलीत धुळखात, अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले आढळून आले. विशेष म्हणजे, गावातील कचरा संकलनासाठी वापरली जाणारी घंटागाडीही याच अडगळीच्या खोलीत बंद करून ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे.
महामानवांचे फोटो आणि सार्वजनिक स्वच्छतेसाठी अत्यावश्यक असलेली घंटागाडी एकाच अडगळीच्या खोलीत दुर्लक्षित अवस्थेत ठेवणे हे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे असल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे.
महामानवांचा अपमान; सामाजिक भावना दुखावल्या
महामानवांचे विचार, संघर्ष आणि त्याग हे समाजासाठी दीपस्तंभासारखे असताना त्यांच्या प्रतिमांना सन्मानाचे स्थान देण्याऐवजी त्यांना अडगळीच्या खोलीत फेकून देणे म्हणजे संपूर्ण समाजाच्या भावना दुखावण्यासारखे आहे. या प्रकारामुळे विशेषतः आंबेडकरी विचारधारेचे अनुयायी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.
घंटागाडी बंद; स्वच्छतेवर थेट परिणाम
गावातील स्वच्छता राखण्यासाठी अत्यावश्यक असलेली घंटागाडी बंदिस्त खोलीत धुळखात पडलेली असल्याने गावातील कचरा संकलन व्यवस्थेवरही प्रतिकूल परिणाम होत असल्याचे चित्र आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या घोषणा देणाऱ्या प्रशासनाकडून प्रत्यक्षात मात्र स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सामाजिक संघटना आक्रमक; पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची मागणी
या गंभीर प्रकारानंतर सामाजिक कार्यकर्ते संजय मुनतोडे, सर्पमित्र शिवप्रसाद पवार, संदीप मुंतोडे, सुशांत मुंतोडे, राहुल मुंतोडे, कृष्णा पंडित व किरण आढाव आक्रमक झाले असून त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठत संबंधित जबाबदार व्यक्तींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
महामानवांचा अपमान हा कायद्याने दखलपात्र गुन्हा असून सार्वजनिक मालमत्तेची अशी दुरवस्था करणेही प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे द्योतक आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये स्वतंत्र चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनांनी लावून धरली आहे.
कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा जर या प्रकरणी तात्काळ गुन्हा नोंदवून दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली नाही, तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणांविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे.
या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. नागरिकांमध्ये तीव्र संताप; चौकशीची मागणी या घटनेमुळे शिबलापूर गावात संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनीही या प्रकाराची निषेध नोंदवली आहे.
महामानवांचा अपमान आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे झालेले दुर्लक्ष याबाबत वरिष्ठ स्तरावर चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.या प्रकरणावर प्रशासन व पोलीस यंत्रणा कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण गावासह परिसराचे लक्ष लागले आहे.
