शिबलापूर ग्रामपंचायतीतील महामानवांच्या प्रतिमेच्या अवमान प्रकरणात प्रशासन निष्क्रिय; 12 जानेवारीपासून थेट उपोषण

चार तासांचे ठिय्या आंदोलन निष्फळ; आश्वी बुद्रूक पोलीस ठाणे, तहसीलदार, बीडीओ व पंचायत समितीकडे निवेदन, संजय मुन्तोडे यांचे जाहीर आवाहन

शिबलापूर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अवमान करण्यात आल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय मुन्तोडे यांनी केला असून, या प्रकरणात स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आता थेट उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे. याबाबतचे लेखी निवेदन संबंधित प्रशासनाला देण्यात आले असून, दि. 12 जानेवारी 2026 पासून शिबलापूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू होणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

या प्रकरणी संजय मुन्तोडे यांनी आश्वी पोलीस ठाणे, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय तसेच गटविकास अधिकारी (बीडीओ) यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. निवेदनात ग्रामपंचायत कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची झालेली अवस्था ही केवळ निष्काळजीपणाची बाब नसून, महामानवांच्या विचारांप्रती असलेल्या असंवेदनशीलतेचे गंभीर उदाहरण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या घटनेच्या निषेधार्थ यापूर्वी आश्वी बुद्रुक पोलीस ठाणे कार्यालयासमोर चार तासांचे शांततामय ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. मात्र, आंदोलनानंतरही कोणतीही चौकशी, खुलासा अथवा जबाबदारांवर कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या या निष्क्रियतेमुळे सामाजिक असंतोष निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद आहे.

दरम्यान, संजय मुन्तोडे यांनी दिलेल्या जाहीर आवाहनात स्पष्ट केले आहे की, बाबासाहेबांचा सन्मान हा केवळ प्रतिमेपुरता मर्यादित नसून तो संविधान, सामाजिक न्याय आणि स्वाभिमानाशी जोडलेला आहे. या प्रकरणात वेळेत व कायदेशीर कारवाई न झाल्यामुळे थेट उपोषणाचा निर्णय घेण्यात आला असून, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष सुरू राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

याचबरोबर त्यांनी तमाम आंबेडकरी समाज, बहुजन बांधव तसेच न्यायप्रिय नागरिकांना कायदेशीर, शांततामय आणि संघटित मार्गाने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. हा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून, व्यवस्थेतील दुर्लक्ष व असंवेदनशीलतेविरोधात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणावर अद्याप ग्रामपंचायत प्रशासन, पंचायत समिती किंवा संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. प्रशासनाकडून खुलासा किंवा कारवाई झाल्यास पुढील स्थिती स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!