राजकारण नाही, श्रद्धा आहे! अजित दादांच्या जाण्याने संपूर्ण गाव शोकसागरात; आश्वी बुद्रुक गाव बंद


आश्वी बुद्रूक : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, त्याचे तीव्र पडसाद आश्वी बुद्रुक गावातही उमटले. अजित दादांवरील अपार श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी आश्वी बुद्रुक येथील व्यापारी पेठेतील व्यावसायिक दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने संपूर्ण गाव बंद ठेवत श्रद्धांजली अर्पण केली. कोणत्याही राजकीय पक्षाच्या आवाहनाविना, कोणत्याही दबावाविना झालेला हा बंद म्हणजे जनतेच्या मनातील भावना आणि आदराचा शांत उद्गार होता.

बातमी कळताच सकाळपासूनच गावातील सर्व प्रकारची दुकाने, व्यापारी आस्थापने, व्यावसायिक व्यवहार पूर्णतः बंद ठेवण्यात आले. नेहमी गजबजलेली बाजारपेठ आज पूर्णपणे शांत दिसून आली. चौकाचौकात शुकशुकाट पसरलेला होता. मात्र या शांततेतही अजित दादांच्या आठवणी, कार्य आणि नेतृत्वाबद्दल बोलणारी भावनिक चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.

अजित दादा हे केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर सर्वसामान्य जनतेसाठी ते आधारवड, मार्गदर्शक आणि संकटात धावून येणारा नेता होते, अशी भावना व्यापारी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली. “आज आम्ही दुकान बंद ठेवले आहे, कारण हा बंद राजकारणाचा नाही, तर मनातून आलेल्या श्रद्धेचा आहे,” अशा भावना अनेक व्यापाऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

गावातील प्रमुख चौकात अजित दादांच्या अशा अचानक जाण्याच्या चर्चा सुरू होत्या तर काही ठिकाणी मौन पाळण्यात आले. काही ठिकाणी भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली सभा घेण्यात आली. ग्रामस्थ, व्यापारी, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. “अजित दादांच्या जाण्याने केवळ एक नेता नाही, तर जनतेचा विश्वास हरपला आहे,” अशा प्रतिक्रिया यावेळी ऐकायला मिळाल्या.

आश्वी बुद्रुकसह परिसरातील अनेक गावांमध्येही शोक व्यक्त करण्यात येत असून, अजित दादांचे नेतृत्व, निर्णयक्षमता आणि सामान्य जनतेशी असलेली नाळ आज प्रकर्षाने आठवली जात आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे, अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

आजचा दिवस आश्वी बुद्रुक गावाच्या इतिहासात भावनेचा, एकजुटीचा आणि माणुसकीचा दिवस म्हणून नोंदवला जाईल. राजकारणापलीकडे जाऊन जनतेच्या हृदयात घर केलेल्या नेत्याला गावाने दिलेली ही श्रद्धांजली म्हणजेच अजित दादांप्रती असलेले अपार प्रेम आणि सन्मानाचे प्रतीक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!