कानिफनाथ महाराजांचा वर्धापन दिन घुलेवाडीत उत्साहात साजरा

नाथभक्तांच्या जनसागराने घुलेवाडी भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाली

संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेले घुलेवाडी गाव वारकरी व नाथ संप्रदायाची परंपरा गेली अनेक वर्षे जपून ठेवत आहे. विविध जाती-धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने नांदणारे हे गाव पुन्हा एकदा धार्मिक एकात्मतेचे दर्शन घडवत कानिफनाथ महाराजांच्या वर्धापन दिनानिमित्त भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले.

घुलेवाडी येथील नाथ सर्कल, कानिफनाथ मळा येथे चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त ओम चैतन्य कानिफनाथ तरुण मित्र मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

वर्धापन दिनानिमित्त सकाळी मंदिरात होम-हवन, अभिषेक, विधिवत पूजा श्रद्धा व भक्तीभावाने संपन्न झाली. याचबरोबर आठ दिवस महिलांच्या सहभागातून नाथ पारायणाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सांगतेनिमित्त टाळ-मृदगांच्या गजरात व पारंपरिक वाद्यांसह मिरवणूक काढण्यात आली, त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांमुळे परिसरात भक्ती, श्रद्धा व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

या पावन प्रसंगी महाराष्ट्रातील नामवंत नाथगायक आकाश शिंदे यांच्या भव्य-दिव्य नाथगीतांच्या कार्यक्रमाने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. ‘बाबा बोलतो बंगाली’, ‘आगे आगे गोरख जागे’, ‘नका समजू साधी-सुधी नाथांची उदी’, ‘अलख निरंजन आदेश’, ‘देव हा मढीचा कानिफनाथ’, ‘जालिंदर नाथांची येवलेवाडी’, ‘नाथ भगव्या कफनीवाला’, ‘पक्यागुरूचा चेला’, ‘छत्रपतीचा जयघोष’ अशा भक्तीमय नाथगीतांनी संपूर्ण परिसर नाथनामाच्या गजराने दुमदुमून गेला.

संगमनेर तालुक्यातील व घुलेवाडीतील नाथभक्तांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उदंड प्रतिसाद दिला.घुलेवाडी गावात प्रथमच इतक्या भव्य स्वरूपात नाथ परंपरेचा कार्यक्रम पार पडला. यशस्वी आयोजनासाठी ओम चैतन्य कानिफनाथ तरुण मित्र मंडळ, नाथ सर्कल, कानिफनाथ मळा येथील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामस्थांचे सहकार्य व भाविक भक्तांची मोलाची मदत यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला.

उत्कृष्ट नियोजनामुळे कार्यक्रम ठरला अविस्मरणीयकानिफनाथ महाराजांच्या वर्धापन दिनानिमित्त आकर्षक लाईट व्यवस्था, भव्य-दिव्य स्टेज, उत्कृष्ट साउंड सिस्टम आणि शिस्तबद्ध नियोजन यासह भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने हा नाथगितांचा कार्यक्रम भव्य, दिव्य व अविस्मरणीय ठरला. कानिफनाथ मळा व घुलेवाडी गावासाठी हा वर्धापन दिन एक मौल्यवान, भक्तीमय आणि संस्मरणीय ठेवा ठरला, अशी भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!