लोकभवन येथे साध्या शपथविधी सोहळ्यात पदभार स्वीकारला; तीन महत्त्वाची खाती सोपवली, अर्थ खाते फडणवीसांकडेच
मुंबई : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राच्या राजकारणात आज ऐतिहासिक क्षण साक्षीला गेला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची तसेच गोपनीयतेची शपथ दिली. लोकभवन येथे साधेपणाने पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यातील राजकीय व प्रशासकीय नेतृत्व मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्रिमंडळातील सदस्य, लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी सुनेत्रा पवार यांचे कुटुंबीय व निमंत्रित मान्यवरांनीही उपस्थिती लावली होती.
शपथविधीनंतर लगेचच मंत्रिमंडळातील खातेवाटप जाहीर करण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण तसेच अल्पसंख्याक विकास व औकाफ ही तीन महत्त्वाची खाती सोपवण्यात आली आहेत. तर यापूर्वी अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे 2026-27 चा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, शपथविधी संपल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामतीकडे रवाना होणार असून, दिवंगत अजित पवार यांच्या दहाव्या दिवसाच्या धार्मिक कार्यक्रमानिमित्त त्या तेथे काही काळ थांबणार असल्याची माहिती मिळत आहे.
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याचे बोलले जात असून, पुढील काळात त्यांच्या खात्यांमधून कोणते निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
