शेतकऱ्यांना दिवसा वीज, पाणी–रोजगार–सुरक्षेसाठी बहुआयामी विकासकामांना गती
आश्वी : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
वरवंडी येथे उभारण्यात येत असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पामुळे आश्वी व परिसरातील पंचक्रोशीतील गावांना लवकरच भारनियमनातून मुक्ती मिळणार असून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. डॉ. विखे पाटील यांनी आश्वी खुर्द, दाढ खुर्द व झरेकाठी या गावांना भेट देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. यावेळी रस्ते, वीज, पाणी, कालव्यांवरील अतिक्रमण तसेच शेतीशी संबंधित प्रश्नांवर शेतकऱ्यांनी मांडलेल्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. संबंधित समस्यांवर प्रशासनामार्फत सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती त्यांनी नागरिकांना दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने सौरऊर्जा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली असून अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक सौर प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. याचाच एक भाग म्हणून वरवंडी येथील सुमारे २० मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून महिन्याभरात ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचा लाभ दाढ खुर्द, चणेगाव, आश्वी खुर्द, शिबलापूर, पानोडी, आश्वी बुद्रूक, उंबरी, शेडगाव व हंगेवाडी या गावांना होणार आहे. तसेच शिबलापूर येथे ५ मेगावॅट क्षमतेचे वीज उपकेंद्र कार्यान्वित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जलसंपदा विभागामार्फत कालवे व चारीवरील अतिक्रमणे पूर्णतः हटवण्यात येणार असून, अतिक्रमणमुक्त कालव्यांमुळे पाण्याची वहनक्षमता वाढणार असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. प्रवरा डाव्या व उजव्या कालव्याच्या नूतनीकरणासाठी १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, निळवंडे धरणाच्या पाण्याचा लाभ वंचित गावांपर्यंत कसा देता येईल, याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारच्या युवककेंद्रित अर्थसंकल्पामुळे उद्योग व रोजगारनिर्मितीला चालना मिळत असून शिर्डी औद्योगिक वसाहतीत सुरू झालेल्या प्रकल्पांमुळे आयटीआय उत्तीर्ण युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले. याच पार्श्वभूमीवर आश्वी परिसरातच कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बिबट्यांच्या वाढत्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागाला अत्याधुनिक साहित्य खरेदीसाठी ९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून थर्मल ड्रोन कॅमेरांच्या मदतीने बिबट्यांना जेरबंद करण्यात यश येत असल्याची माहितीही पालकमंत्र्यांनी दिली.
