“नाशिक–मराठवाड्याच्या तहानेला दिलासा देणाऱ्या नदीजोड प्रकल्पांना गती; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा सखोल आढावा”

दमणगंगा–वैतरणा–गोदावरी व कृष्णा–भीमा नदीजोड प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा; अतिरिक्त पाण्याच्या नियोजनावर भर

संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

राज्यात राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांच्या कामांना गती देण्याच्या दृष्टीने जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दमणगंगा–वैतरणा–गोदावरी नदीजोड प्रकल्प, दमणगंगा–एकदरे–गोदावरी नदीजोड प्रकल्प तसेच कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त पुराचे पाणी भीमा नदी खोऱ्यात वळविण्यासाठी सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.

मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित आढावा बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र)चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, जलसंपदा सचिव संजय बेलसरे, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोकणातील जलसमृद्ध खोऱ्यांमधील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून नाशिक व मराठवाडा भागातील पाणीटंचाई दूर करणे, हा या नदीजोड प्रकल्पांचा मुख्य उद्देश असल्याचे जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पांमुळे शेती, पिण्याचे पाणी तसेच औद्योगिक वापरासाठी दीर्घकालीन जलसुरक्षेला बळकटी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारीतील अतिरिक्त जमिनी पर्यावरणपूरक पद्धतीने तसेच पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याबाबत धोरण निश्चित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. धरण क्षेत्रालगतच्या या जमिनी सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर विकसित व व्यवस्थापित करण्यात येणार असून, यामुळे महामंडळाच्या उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे.

पुणे व सोलापूर जिल्ह्यांत या धोरणानुसार प्राथमिक कार्यवाही सुरू करण्यात आली असून, पुढील टप्प्यात इतर जिल्ह्यांतही त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले. नदीजोड प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी नियोजनबद्ध, पारदर्शक आणि पर्यावरणस्नेही दृष्टिकोन ठेवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!