“जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा जनसंवाद; पुरंदर–शिरूरमध्ये उमेदवारांच्या प्रचाराला गती”

जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद; विकासकामे व पाणी प्रश्नावर भर

निर्भीड जनता न्यूज नेटवर्क :

पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुरंदर व शिरूर तालुक्यात नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या. या कार्यक्रमांमध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरंदर तालुक्यातील गराडे, बेलसर, वीर आणि निराशिवतकार गटातील तसेच पंचायत समिती गणातील उमेदवारांच्या प्रचारासाठी ग्रामस्थांशी थेट संवाद साधण्यात आला.

यावेळी उपस्थित नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन आगामी विकासकामांबाबत माहिती देण्यात आली. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांमुळे ग्रामीण भागात पायाभूत सुविधा, शेती, पाणीपुरवठा आणि रोजगाराच्या संधी वाढतील, असे डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारने अलीकडील अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या विविध निर्णयांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवली. या योजनांचा लाभ घेण्यासाठी मतदानाचा योग्य वापर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या दौऱ्यादरम्यान परिसरातील पाण्याच्या प्रश्नावर विशेष भर देण्यात आला. सिंचन प्रकल्पांच्या कामांसाठी आवश्यक निधी कमी पडू नये यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असून, पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा शासनाचा मानस असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित शेतकरी बैठकीतही डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. या बैठकीत राज्यातील भाजपा-महायुती सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी सुरू असलेल्या कामांची माहिती यावेळी देण्यात आली.

तसेच, या भागाला पुरेसे पाणी मिळावे यासाठी जलसंपदा विभागामार्फत सातत्याने प्रयत्न सुरू असून, येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संबंधित बैठक घेऊन पाणी समस्येवर अंतिम निर्णय घेण्याचे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही शेतकऱ्यांना देण्यात आली. यावेळी भाजपा-महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले.

या सर्व कार्यक्रमांना आमदार श्री. राहुल कुल, माजी आमदार श्री. संजय जगताप, श्री. अशोक टेकवडे, जिल्हाध्यक्ष श्री. शेखर वढणे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!