विविध विकासकामांची पाहणी, घरकुल भूमिपूजन, शेतकरी संवाद व गोशाळा भेटीद्वारे प्रशासनाचा थेट संवाद
अहिल्यानगर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
तालुक्यातील जमीन महसूल वसुलीचे उद्दिष्ट तातडीने पूर्ण करावे तसेच फेरफार प्रकरणांचा त्वरित निपटारा करून नागरिकांची गैरसोय टाळावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. अहिल्यानगर तहसील कार्यालयात आयोजित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, फेरफार प्रकरणे प्रलंबित राहिल्यास नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे नियम व कार्यपद्धतींचे काटेकोर पालन करून पारदर्शक, वेळबद्ध व लोकाभिमुख कार्यवाही करण्यात यावी. महसूल प्रशासनाने नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर विशेष भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.
बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी तालुक्यातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. मौजे पिंपळगाव उज्जैनी येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या शासकीय जागेवर १२ घरकुलांच्या बांधकामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक लाभार्थ्याला ५०० चौरस फूट जागा देण्यात आली असून, घरकुल बांधकाम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तसेच ‘डीसीएस’ प्रकल्पांतर्गत रोहिदास गंगाधर वाघ व चंद्रकला कानिफ वाघ यांच्या शेतावर जाऊन पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतीसाठी आवश्यक मार्गदर्शन व शासकीय योजनांची माहिती देत त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले.
मांजरसुंबा येथील गांडूळखत प्रकल्प व गोशाळेस भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पशुधनाचे आरोग्य, चारा व्यवस्थापन, स्वच्छता आणि गोसंवर्धनाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. गोशाळा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
‘स्वच्छ सुंदर माझा गाव’ उपक्रमांतर्गत त्यांनी गावभेट देऊन स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. गावातील स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणांची निगा, सांडपाणी व्यवस्थापन व नागरिकांचा सहभाग समाधानकारक असल्याचे नमूद करत स्वच्छता अभियान सातत्याने राबविण्याचे निर्देश दिले.
या दौऱ्यामुळे प्रशासन व नागरिकांमधील थेट संवाद वाढून विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
